जालना । वार्ताहर
जालन्यातील कोरोनाचा वाढता आकडा कमी करण्यासाठी सहवासितांचा शोध व तपासण्या अधिक प्रमाणात करण्याबरोबरच गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणावर प्रशासनाने अधिक भर देऊन जिल्ह्यात अँटजेन तपासण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनातील प्रमुख अधिकार्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार सर्वश्री कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, संतोष दानवे, राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, कोरोना वाढता आकडा रोखण्यासाठी प्रशासकीस अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी एकसंघपणे व समन्वयाने काम करण्याची गरज असुन लोकप्रतिनिधींनी केलेल्या उपयुक्त अशा सुचनांची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी. जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड बाधितांमध्ये 85 टक्के रुग्ण हे जालना शहरातील असुन उर्वरित 15 टक्के रुग्ण हे ग्रामीण भागामधील आहेत. बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचुकपणे शोध घेऊन त्यांचे गृहअलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 10 ते 12 व्यक्तींचा शोध घेण्यात येत असुन ही संख्या वाढवत ती 20 ते 22 सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. अलगीकरण केलेल्या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल पाच दिवसानंतर घेण्यात येतो. परंतु ज्यांना लक्षणे आहेत अशा व्यक्तींच्या स्वॅब तातडीने घेऊन तो तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जालना जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तातडीने मिळावेत यादृष्टीकोनातुन जालना येथे अथक प्रयत्नातुन आरटीपीसीआर लॅबची उभारणी करण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातुन संशयितांचे अहवाल 24 तासांच्या आत मिळाले पाहिजेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी. लॅबसाठी तांत्रिक मनुष्यबळ कमी पडत असेल तर तातडीने भरती प्रक्रिया राबवावी. तसेच डेटा भरण्यासाठी तीनही पाळयांमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करुन काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना व्हेंटीलेटर, डायलिसीस यासारख्या 977 प्रक्रियांना मान्यता देण्यात आली असुन यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत खासगी रुग्णालयांना उपचाराचे दर ठरवुन देण्यात आलेले आहेत. ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक प्रमाणात दर रुग्णालयांना आकारता येणार नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत समावेश असलेल्या खासगी रुग्णालयांना शासनामार्फत पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असुन कोव्हीड बाधितांवर उपचार घेणार्या रुग्णांना देण्यात येणार्या बिलामध्ये यापुढे पीपीई किटच्या बिलाचा समावेश करता येणार नाही. खासगी दवाखान्यांमध्ये बिलांच्या तपासणीसाठी परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढत चाललेला आकडा कमी होण्यासाठी जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रबोधन करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी. तसेच जालना येथील आरटीपीसीआर लॅबमधुन देण्यात येणार अहवाल हे चोवीस तासाच्या आत मिळावेत. त्याचबरोरबच मास्क, सामाजिक अंतराचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी आमदार राजेश राठोड, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे यांच्यासह उपस्थित पदाधिकार्यांनी कोरोना विषाणुला हरवण्यासाठी उपयुक्त अशा सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोना विषाणुच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन सभागृहाला माहिती दिली. बैठकीस सर्व नगरपालिका व नगरपंचायत नगराध्यक्ष, सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकार्यांची उपस्थिती होती.
Leave a comment