औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विळखा शहरासोबतच ग्रामीणमध्येही घट्ट होत चालला आहे. त्यातच वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. वाळूजला 4 जुलैपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे शहरातही संचारबंदी लागू होणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने सोमवारी होणार्या प्रशासनाच्या बैठकीकडे अवघ्या शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
कर्फ्यू लागला तर कडक असेल
शहराचे परिस्थितीबाबत सोमवारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल. त्यानंतर लॉकडाउन, कर्फ्यू, संचारबंदीचा निर्णय होईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. संचारबंदी, लॉकडाउनने कोरोनावर पूर्ण नियंत्रण शक्य नाही; परंतु रुग्णसंख्येला आळा बसू शकतो. तसेच सोमवारपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही तर कर्फ्यू लावावा लागेल आणि हा कर्फ्यू साधारण नसेल, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडणे, कामानिमित्ताने बाहेर आल्यावर तोंडाला मास्क लावणे, विनाकारण कुठेही हात लावू नये, असे सांगूनही लोक ऐकत नसल्यामुळेच प्रशासन पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत सोमवारी काय निर्णय होतो, संचारबंदी लागेल का, कधीपासून लागेल, त्याचे स्वरूप काय असेल, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment