सिल्लोड । वार्ताहर
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तांडा बाजार ता. सिल्लोड येथे पूर्णा नदीवरील फुटलेल्या केटीवेअर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहेत. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिले होते.
गेल्या वर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तांडा बाजार येथील पूर्णा नदीवरील केटीवेअर फुटल्याने परिसरातील शेतकर्यांचे नुकसान झाले होते. शिवाय नदी मधील पाणी वाहून जात होते. त्यावेळी ना. अब्दुल सत्तार यांच्या सूचनेने तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्वरित दुरुस्ती करण्यात आल्याने तांडा बाजार परिसरातील शेतकर्यांना रब्बीचे पीक घेता आले. शिवाय या परिसरात सिंचन विहिरीनाही पाणी टिकून राहिले. ना. अब्दुल सत्तार यांनी दोन आठवड्यापुर्वी शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भवन जिल्हा परिषद सर्कल मधील विविध गावांचा दौरा केला होता. यावेळी ना. अब्दुल सत्तार यांनी पूर्णा नदीवरील भविष्यातील पूरस्थिती व धोका पाहता तांडा बाजार येथील पूर्णा नदीवरील ’त्या ’ फुटलेल्या केटीवेअर ची पक्की दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने सदरील केटीवेअर मध्ये पक्की भर टाकून पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आहे . यामुळे पूर्णा नदीवरील परिस्थितीतील धोका टळणार असून सदरील केटीवेअर मध्ये क्षमतेने पाणीसाठा अडविले जाणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध होईल सोबतच सिंचन विहिरी व पाणी पुरवठ्याच्या विहिरींनाही मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे .या कामाबाबत तांडा बाजार व परिसरातील शेतकरी व नागरिकांनी ना. अब्दुल सत्तार यांचे आभार व्यक्त केले.
Leave a comment