औरंगाबाद । वार्ताहर

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन,आरोग्य , पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.मात्र तरीही संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाळूज परिसरात संचारबंदी लावण्यात आली आहे.त्याचे काटेकोरपण पालन करुन जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे केले. वाळूज औद्योगिक परिसरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आजपासून दि.12 जूलै पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.या संचारबंदीच्या निर्णयाला लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिला असून सर्वांना विश्वासात घेऊन नागरिकांना पूर्वकल्पना देऊन ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संचारबंदी अमंलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी वाळूज , वडगाव कोल्हाटी, जयभवानी नगर, वाळूज पोलिस स्टेशन तसेच  येथील कंटेनमेंट परिसरातील भागात भेट देऊन पाहणी केली.यावेळी त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद ही उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.चौधरी यांनी वाळूज आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची पाहणी करून संचारबंदी यशस्वी करण्यासाठी संबंधितांना विविध सूचना दिल्या. तसेच वाळूज येथील आयसीईईएम कॉलेजच्या वसतिगृहाची इमारत प्रशासनाने कोवीड केअर सेंटरसाठी अधिग्रहित केली आहे.त्यामध्ये खाटा व इतर सर्व सुविधा तयार करण्यात आलेल्या आहेत.त्याची पाहणी देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली. या संचारबंदीमध्ये कारखाने,दूध,औषध दुकाने यांना सूट देण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात या औद्योगिक परिसरातील वाळूज आणि सात ग्राम पंचायतीमध्ये 836 केसेस कोरोनाच्या सापडल्या आहेत. त्यात मृत्यु झालेल्या रुग्णांचा आकडा  तीन इतका असून वाढत जाणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही संचारबंदी लावण्यात आली आहे. त्या सोबतच कोरोनामुक्तीसाठी प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित आहे. यामध्ये संचारबंदीच्या या आठ दिवसात येथील 225 सोसायटी आणि इतर जे गावातील भाग आहेत, त्या ठिकाणच्या नागरीकांचे घरोघरी जाऊन सर्वैक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रशासनाच्या 275 पथकाद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या आधी देखील प्रशासनामार्फत हे सर्वेक्षण कंटेनमेंट आणि इतर परिसरात करण्यात आले असून त्याद्वारे जवळपास 225 लोकांचे लाळेचे नमुने तपासणी केली.त्यातुन सत्तर लोक हे कोरोनाबाधीत आले होते.हे प्रमाण वाढू नये त्यासाठी ही संचारबंदी लावण्यात आली आहे. पोलिस आयुक्त श्री.प्रसाद यांनी जनतेने संचारबंदीला यशस्वी प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य करावे. या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन , आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणा समन्वय पूर्वक काम करत आहे. कोरोनामुक्तीसाठी मास्कचा वापर, सुरक्षित अतंर राखणे, गर्दी टाळणे या नियमांचे पालन करुन स्वतःसह इतरांच्या जीवीताची काळजी घेण्याचे आवाहन  यावेळी केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.