औरंगाबाद । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना वेंटीलेटर, आय.सी.यु. बेड, तज्ज्ञ पथक यांसारख्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करावी अशी सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज शहरातील प्रमुख खाजगी रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकार्यांची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, बजाज हॉस्पिटलचे डॉ. वर्मा, एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. प्रविण सुर्यवंशी, धुत हॉस्पिटलचे डॉ. संजय सुर्वे, एमआयटी हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र प्रधान, एशीयन हॉस्पिटलचे डॉ. शोएब हाश्मी, हेगडेवार हॉस्पिटलचे डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, मानिक हॉस्पिटलचे डॉ. राजेश्वर किश्ते, ईएसआयएस हॉस्पिटलच्या डॉ. अंजली बनसोड आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी या खाजगी रुग्णालयांच्या अडचणीही श्री. चौधरी यांनी जाणून घेत त्यावर करावयाच्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली.
श्री. चौधरी म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन, शासकीय रुग्णालये, पॅरामेडिकल युध्द पातळीवर कार्य करीत आहे. यास्थितीत शहरातील प्रमुख खाजगी रुग्णालयांनीही कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी आपल्या रुग्णालयातील आय.सी.यु. बेड, वेंटीलेटर, तज्ज्ञ पथक सुविधांमध्ये वाढ करुन आपले योगदान द्यावे. त्याचबरोबर सामान्य रुग्णांवर उपचार करातांना कोरोना रुग्ण यांचा परस्पर संपर्क येणार नाही याची काळजी घेण्याची सुचना केली. तसेच महापालिकेच्या एमएचएमएच पवर शहरातील रुग्णांलयात उपलब्ध असणार्या आय.सी.यु. बेड ची दररोजची माहिती देण्यात यावी. जेणेकरुन नागरिकांपर्यंत ही माहिती पोहचेल. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती घेतली.
Leave a comment