औरंगाबाद । वार्ताहर
ग्रामीण भागासह जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात जनावरांची चोरी करणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इम्रान शेख वय 28 रा.अब्दूलशहा नगर, सिल्लोड जि. औरंगाबाद) , अमिरखान पठाण वय 24 रा. मालेगाव जि. नाशिक) व आसिफअली शौकत अली वय 20 रा. मालेगाव जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून औरंगाबाद ग्रामीण भागात जनावरांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक तयार करण्यात आले आहे.
याबाबत शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, इम्रान शेख नामक व्यक्ती रा. सिल्लोड जनावरांची चोरी करत आहे. शुक्रवारी रात्री वैजापूर-कन्नड भागात गस्त घालत असताना औरळी ते पाणपोई रोडवर एक महिंद्रा पिकअप जलद गतीने जात असताना दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्याचा पाठलाग करून रात्री दीड वाजता पिकअप अडवले. त्यातील तीन व्यक्तींकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी औरंगाबाद ग्रामीण व धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, त्यांच्याकडून रोख 7560 रुपये, तीन मोबाईल व एक पिकअप असा एकूण 5 लाख43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना सिल्लोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Leave a comment