ना.अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने बँक शाखा अधिकार्यांची बैठक संपन्न
सिल्लोड । वार्ताहर
शेतकर्यांना बँकेची कामे सहज सोपे व्हावेत यासाठी बँकांनी ऑनलाइन वरून डिजिटल सातबारा, फेरफार नक्कल काढून शेतकर्यांना सहकार्य करावे असे स्पष्ट करीत यापुढे शेतकर्यांना पीक कर्जासाठी ऑनलाईन सातबारा , फेरफार नक्कल मागू नये असे स्पष्ट आदेश उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी ना. अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा अधिकारी, व्यवस्थापकांना दिल्यात.
महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी शेतकर्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मतदार संघात दौरा केला होता. यावेळी काही शेतकर्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे ना. अब्दुल सत्तार यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना तात्काळ बँक शाखा अधिकारी यांची बैठक घेऊन फेरफार नक्कल साठी बँकांकडून शेतकर्यांची अडवणूक होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवार ( दि.19 ) रोजी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड येथे बँक शाखा अधिकार्यांची बैठक संपन्न झाली. या यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, बँक ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद चे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना च्या संकटकाळात जो - तो हतबल झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आर्थिक आधार देण्यासाठी बँकांकडून सहकार्याची मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे बँकांनी शेतकर्यांना सातबारा, फेरफार नक्कल मागू नये. बँकांनी यापुढे ऑनलाइन पोर्टल, भुमिअभिलेख यांच्या वेबसाईट किंवा मोबाईलवरून सातबारा ,फेरफार नक्कल काढून घ्यावेत. जे डॉक्युमेंट ऑनलाइन वर उपलब्ध नाही असे डॉक्युमेंट संबंधी बँकांनी शेतकर्यांची एकत्रित यादी संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावी. तलाठी आपणास सदरील कागदपत्रे उपलब्ध करून देईल असे उपविभागीय अधिकारी श्री पाटील म्हणाले . कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने बँकेत व तहसील कार्यालयात गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करणे तसेच शेतकर्यांच्या पीक कर्जासाठी दिरंगाई होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी बँक शाखाधिकार्यांना बैठकित दिल्या. बैठकीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक प्रमोद मोरे ( सिल्लोड ) मयुर देशपांडे ( अन्वी ), अविनाश अंबेराव ( डोंगरगाव) , उमेश करपटे ( शिवना ), समीर रंजन ( अजिंठा ) बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक हरिदास काकडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक एन.आर पवार ( सिल्लोड ), बी.आर.भोई ( घाटनांद्रा ) ,आयसीआयसीआय बँकेचे अमित जोशी, विठ्ठल शिंदे, युनियन बँकचे व्यवस्थापक श्रीकांत पवार आदींसह बँक ऑफ इंडिया, बंधन बँक, इत्यादी राष्ट्रीयीकृत बँक शाखा व्यवस्थापक यांची उपस्थिती होती.
Leave a comment