वैजापूर । वार्ताहर
औरंगाबाद मराठवाडा पदवीधर व ग्रामीण भागातील पंधरा मतदान केंद्रातील सोयी सुविधाची तपासणी करुन त्यांचा अहवाल जिल्हा निवडणूक विभागाकडे सादर करण्याचे आदेश उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.भारत कदम यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.त्यानुसार वैजापूर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांच्यासह अव्वल कारकून जहीर बेग, गणेश चौकडे यांच्या पथकाने सोमवारी वैजापूर शहरातील तीन व ग्रामीण भागातील बोरसर येथील एक अशा चार मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील सुविधाची पाहणी केली.तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 15 मतदान केंद्र आहेत.औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद सदस्य निवृत्त होत असल्याने त्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया निवडणूक विभागाने हाती घेतली होती.दरम्यान कोरोना महासाथीमुळे तयारी प्रक्रिया तीन महिने थंडावली होती.लाँकडाऊनच्या आदेशात शिथिलता आल्याने निवडणूक विभागाकडून पुर्वतयारी नियोजनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहेत.
तालुक्यात पाच हजार 676 पदवीधर मतदार
निवडणूक विभागाने 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीत तालुक्यातील 15 मतदान केंद्रा अंतर्गत 5 हजार 676 मतदार संख्या आहे.त्यात पुरुष मतदार संख्या 4 हजार 408 लक्षणीय असून महिला पदवीधर मतदार संख्या 1 हजार 268 आहे.
15 मतदान केंद्र व मतदार संख्या पुढील प्रमाणे
पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी यापुर्वी केवळ शहर भागातच मतदान केंद्राची सुविधा होती.त्यात निवडणूक विभागाने सुधारणा करुन जिल्हा परिषद गटाच्या गावात पदवीधर मतदारांना मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लोणी खुर्द 337 शिऊर 407 गारज 333 जानेफळ 145 खंडाळा 250 बोरसर 337 वैजापूर ग्रामीण 142 लासुरगाव 427 घायगाव 243 वैजापूर शहर एक 661 वैजापूर शहर दोन 825 वैजापूर शहर तीन 838 मालेगाव 388 नागमठाण 151 बाबतरा 192
दोन दिवसात तपासणी पुर्ण होईल -नायब तहसीलदार महेंद्र गिरगे
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.भारत कदम यांच्या सूचनेनुसार वैजापूर तालुक्यातील 15 मतदान केंद्र तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.मतदान केंद्रात मूलभूत सुविधाची पाहणी करुन ज्या ठिकाणी सुविधा नसतील त्या उपलब्ध केल्या जातील असे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी सांगितले.
Leave a comment