सोयगाव । वार्ताहर
सोयगाव तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत कंकराळा येथील भिल्ल वस्तीतील रहिवाशांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या नुकसानग्रस्त कुटुंबांना महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या वतीने संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य व किराणा किट वाटप करण्यात आले.
सोमवार,दि.15 रोजी सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ना.अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. झालेल्या अतिवृष्टीत कंकराळा येथील नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने 30- 35 कुटुंब असलेल्या भिल्लवस्तीत हे पाणी शिरले. यामुळे त्या कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले. घरातील अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले . ही स्थिती पाहताच ना. अब्दुल सत्तार यांनी तात्काळ संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य व किराणा किट खरेदी करून त्यांना वाटप केले. संकट काळात धावून येणारा नेता म्हणून ना. अब्दुल सत्तार यांची ख्याती आहे. मतदारसंघात अनेक वेळा आलेल्या संकटामध्ये ना. अब्दुल सत्तार यांनी सर्वसामान्यांना मोलाचा धीर देऊन व स्वपदरची मदत केलेली आहे. सोमवारी ना. अब्दुल सत्तार यांनी कंकराळा येथील भिल्ल वस्तीची पाहणी करताच त्वरित सोयगाव येथुन जीवनावश्यक मदतीचे साहित्य खरेदी करून नुकसानग्रस्तांना वाटप केले. यामुळे भिल्लवस्तीतील ’त्या’ कुटुंबांना मोठ्या प्रमाणात आधार मिळाला. या उपक्रमाबद्दल भिल्लवस्तीतील रहिवासीयांनी ना. अब्दुल सत्तार यांचे आभार मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील , युवानेते अब्दुल समीर, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड ,शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे, जिल्हा परिषद सदस्य गोपी जाधव ,कुणाल राजपूत, शिवदास राजपूत आदींची उपस्थिती होती.
Leave a comment