औरंगाबाद । वार्ताहर
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा औरंगाबाद तालुका उपाध्यक्ष अमोल ताठे हा तरुण औरंगाबादहून भगवान गडाच्या दिशेने हाती मशाल घेऊन धावत आहे. बजाजनगर येथील मोहटा देवीचे दर्शन घेऊन रविवारी (ता. 14) त्याने धावायला सुरुवात केली. साधारणतः पावणे दोनशे किलोमीटरचे अंतर कापून हा तरुण भगवान गडावर धनंजय मुंडेच्या प्रकृतीसाठी साकडे घालणार आहे. धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संकटातून ते सुखरूप बाहेर यावेत, यासाठी राज्यातून त्यांच्या समर्थकांनी प्रार्थना आणि सदिच्छा दिल्या आहेत.दरम्यान, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.
याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, 10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. वर्धापन दिन आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. तर, येत्या काही दिवसांत धनंजय मुंडे पुन्हा सक्रीय होतील अस आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल असून धनुभाऊंची प्रकृती चांगली असल्याचं देखील त्यांनी सांगितल आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सर्व नियमांचं पालन झाल आहे, तर मंत्रीमंडळ बैठकीत देखील नियमांचं पालन केले गेल्याची माहिती राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Leave a comment