औरंगाबाद । ंवार्ताहर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जलदूत संस्थेच्या जलदूतांनी स्वखर्चाने व विद्यार्थी जलदूतांच्या श्रमदानातून मागच्या वर्षी बांधलेला फेरोसिमेंटचा बंधारा आज झालेल्या पहिल्याच पावसाने ओसंडून वाहायला लागला. तो पाहण्यासाठी विद्यापीठ परिसरातील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांची आज बंधार्यावर गर्दी होत होती. जलदूत संस्थेच्यावतीने जलसंधारणाची कामे केली जातात, किशोर शितोळे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद असून, सामाजिक चळवळीत अविरत कार्यरत असतात. विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी विद्यापीठ परिसरात जलसंवर्धनाची चळवळ सुरू केलेली आहे. त्यात रेनवाटर हार्वेस्टिंग, बारवांचे पुरुज्जीवन हे कार्य सुरू आहे, यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थीही सहभागी असतात. या बंधार्यामुळे परिसरातील 2 बोअर वेल, दोन विहिरी, एक बारवेचे पाणी वाढले आहे.
यासारखं सुख नाही, सर्व जलदूतांचे श्रम कामी आले. गतवर्षी बंधार्याचे काम सुरू असतानाच त्या ओढ्याला पूर आला आणि डाव्या बाजूची सरंक्षण भिंत वाहून गेली होती, पाऊस जुलैमध्ये येईल म्हणून या 15 दिवसांत दुरूस्तीचे नियोजनही केले होते, पण आजच्या पुराच्या पाण्याने आता या वर्षी ही दुरुस्ती करता येणार नाही. पण आज मला विद्यापीठातून अनेकांनी भरलेल्या बंधार्याचे फोटो, शूटिंग पाठवून फोन करून ही आनंदाची बातमी कळविली, अभिनंदन केले. यामुळे कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते, याचे सर्व श्रेय विधायक कार्य करणार्या आमच्या सर्व जलदूतच्या युवकांना जाते, हे विद्यार्थी माझी ऊर्जा वाढवतात.
-किशोर शितोळे, अध्यक्ष- जलदूत, व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ.बा.आ.म.विद्यापीठ, औरंगाबाद
Leave a comment