सिल्लोड । वार्ताहर
तालुक्यात गुरुवार व शुक्रवार रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करा अशा सूचना महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी अधिकार्यांना दिल्या. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, उंडणगाव , अंभई ,अजिंठा मंडळातील विविध गावांमध्ये झालेल्या नुकसानीची ना. अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली .
यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, युवानेते अब्दुल समीर ,तहसीलदार रामेश्वर गोरे,शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, डॉ.संजय जामकर, देविदास पाटील लोखंडे, बाजार समितीचे संचालक दामुअन्ना गव्हाणे, तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी ,नायब तहसीलदार विनोद करमनकर, संचालक दामुअण्णा गव्हाणे, निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, आदींची उपस्थिती होती. सिल्लोड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये शेतकर्यांचे ठिबक संच, नदीकाठच्या शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .बर्याच ठिकाणी शेतकर्यांनी लागवड केलेले मिरची व अद्रक पीक वाहून गेले. घरांची पडझड झाली. बर्याच ठिकाणी रस्ते वाहून गेले असल्यामुळे त्वरित पंचनामे होणे गरजेचे आहे. जेणे करून नुकसान किती प्रमाणात झाले हे स्पष्ट होईल. असे स्पष्ट करीत नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनामा पासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घेऊन त्वरित पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा अशा सूचना ना. अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकार्यांना यावेळी दिल्यात. यावेळी राजुमिया देशमुख, धोत्रा सरपंच पद्मबाई ज्ञानेश्वर जाधव, जीवन जाधव, मंडळ अधिकारी शिवाजी सोनवणे, श्री. दांडगे, तलाठी श्रीमती एस.बी. भोकरे, ग्रामसेवक एन.एस. चौथे, कृषी सहायक किशोर बोराडे, जि. टी. सोनवने आदींची उपस्थिती होती.
Leave a comment