नेकनुर/ मनोज गव्हाणे
कुटुंबवत्सल असलेल्या महाराष्ट्रात एकत्रित नांदणाऱ्या तीन पिढ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट राहावे लागणार आहे. वृद्ध आणि लहान बालके या आजाराच्या भक्षस्थानी असल्याने काळाची पावले ओळखून युवकांनी बाहेर पडताना तीन,चार पिढ्यांची सुरक्षितता आपल्या हातात असल्याचे भान ठेवने गरजेचे बनले आहे.
कोरोनाच्या लढाईत इटली, अमेरिका प्रगल्भ देशांशी सध्याची अवस्था न पहावनारी आहे. या देशांत कौटुंबिक जिव्हाळा आपल्या सारखा नाही. आपल्याकडे आजही तीन,चार पिढ्या एकत्रित नांदतात. वृद्ध, लहान मुले यामुळे घराला घरपण लाभते . आजही कित्येक कुटुंबे एकमेकांना दूर ठेवू शकत नाहीत. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर सर्व कुटुंबाची होणारी घालमेल हे चित्र आपल्या संस्कारमय संस्कृतीत दिसून येईल. पाश्चिमात्य देशात याउलट स्थिती आहे. कोरोना नावाच्या आजाराने माणसे मरताना प्रगल्भ देश आज हतबल झाल्याचे पाहायला मिळते. या तुलनेत भारताने यावर नियंत्रण ठेवल्याने परिस्थिती हातात आहे . दहा दिवसापासून सुरू झालेल्या लॉक डाऊनने अनेकांना घरात बसने नकोसे झाले असल्याचे दिसून येते. विशेषता युवा वर्ग बाहेर पडून पोलिसांचा मार खात असला तरी पुन्हा पुन्हा बाहेर दिसतोच सोशल डिस्टन्स ला हरताळ फासत गर्दी करत आहे. यामुळे हातात असलेली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे यासाठी युवकांनी जागृत नागरिकांची भूमिका अंगीकारत देशासमवेत कुटुंबाला वाचवण्यासाठी काही दिवस निर्बंध पाळावेत जेणेकरून जीवघेन्या कोरोनाला हद्दपार करणे सोपे होईल.
लॉकडाऊन ,संचारबंदी यामुळे शक्यतो लहान मुले ,वृद्ध घरातच आहेत. बाहेर दिसतो तो युवक कामानिमित्त बाहेर पडणे स्वाभाविक असले तरी अनेक जण शिथिलतेच्या काळात गर्दी करत असल्याने पोलिसांना काठी उचलावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. देश संकटात आहे अशा स्थितीत युवकांनी स्वतःहून काही बंधने अंगीकारणे गरजेचे आहे कारण या युवकांच्या हातात भूत, वर्तमान,भविष्य या तीन गोष्टी आहेत. इतर देशाच्या तुलनेत आपल्याकडे संस्काराची शिदोरी असल्याने कोरोनाला मात देणे सोपे आहे. गरज आहे ती फक्त वेळीच स्वतः बंधने पाळण्याची.
Leave a comment