औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना विषाणूच्या धर्तीवर नागरिकांच्या व रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने होत असलेल्या कार्यवाहीची पहाणी करतांना अप्पर विभागीय आयुक्त डॉ विजयकुमार फड यांनी मौ. बिल्डा ता.फुलंब्री येथील कोवीड केअर सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधून कोरोनामुक्त होणार्या रुग्णांनी या मुक्तीच्या आनंदाची आठवण म्हणून वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे म्हटले. औरंगाबाद विभागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्व स्तरावरुन योग्य ती कार्यवाही चालू आहे. तथापि, सदर कार्यवाहीत कांही उणीवा आहेत का ? किंवा इतर ठिकाणी अंमलात आणता येण्यासारखा विशेष काही उपक्रम, कार्यपध्दती राबविली जात आहे का? तसेच काही अडचणी आहेत का, की ज्यात विभागीय आयुक्त स्तरावरुन सहकार्याची गरज आहे, याची पहाणी करण्यासाठी अप्पर विभागीय आयुक्त डॉ.फड व उपायुक्त विकास श्रीमती विणा सुपेकर यांनी फुलंब्री तालुक्यातील मौ.बिल्डा येथील केंद्रास भेट देऊन पहाणी केली. यावेळी फड व सूपेकर यांनी सर्व संबंधित बाबीचे अवलोकन करुन रुग्णांशी व उपस्थितांशी संवाद केला.
कोरोनाच्या अनुषंगाने विविध विभागाच्या ज्या जबबादा-या आहेत त्या जबाबदार्या कशाप्रकारे पार पाडल्या जात आहेत, त्याचा आढावा घेतला. फड व सुपेकर यांना कोरोनाच्या अनुषंगाने काम करीत असलेल्या सर्व यंत्रणामध्ये चांगला समन्वय दिसून आला. कोरोनाच्या अनुषंगाने एकप्रकारे कोरोना योध्दा म्हणून आपण जे कार्य करीत आहोत, ते कार्य करतांना कितीही व कशाही अडचणी आल्या तरी आपणास हे कार्य करायचेच आहे व हे एकप्रकारचे युध्द जिंकायचेच आहे, असे त्यांनी उपस्थितांना म्हटले. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने औरंगाबाद व अन्य ठिकाणी केल्या जात असलेल्या कांही आगळया वेगळया उपक्रमाची माहीती त्यांनी उपस्थितांना दिली. रुग्णांना आनंदी व सकारात्मक ठेवण्याच्या अनुषंगाने काही सूचना केल्या. आम्हाला येथे सर्व प्रकारची सुविधा मिळत असून आमची काळजी घेणारे सर्व अधिकारी कर्मचारी चांगले असल्याचे रुग्णांनी म्हटले. फड व सुपेकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. प्रशासकीय सेवा सुविधेबाबत रुग्णांचे मनोगत जाणून घेतले. कोरोनामुक्त होणा-या रुग्णांनी या मुक्तीच्या आनंदाची आठवण म्हणून वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे म्हटले. आज रोजी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या हस्ते तेथे वृक्ष लावून घेण्यात आले. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या चुकीच्या किंवा दुर्लक्ष करुन वागण्याचा परीणाम आपल्याबरोबर अनेकांना भोगावा लागू शकतो, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आपणा प्रत्येकांना कोरोनाला रोखण्यात आपली भूमीका बजावता यायला हवी, असेही ते म्हणाले. फड यांचे समवेत उपायुक्त विकास श्रीमती विणा सुपेकर, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, गट विकास अधिकारी अशोक दांडगे, वैदयकीय अधिक्षक अरविंद हंबरडे, तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्ना भाले, मंडळ अधिकारी छैय्याबुवा गोसावी, नोडल अधिकारी जगदीश सावंत व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment