औरंगाबाद । वार्ताहर
जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून कन्नडमधील वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनात वाढ करावी. तसेच कोविड केअर सेंटर तयार ठेवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे दिले. कन्नड येथे कोविड 19 उपाययोजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. उदयसिंग राजपूत यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासह बैठकीला नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, पंचायत समिती सभापती आप्पासाहेब घुले, उपसभापती डॉ. नयना तायडे , मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंडाळ यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील कोरोना बाबत सद्यपरिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाय योजनांबद्दल सविस्तर आढावा घेतला. संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर व कोविड आरोग्य केंद्र आवश्यकते नुसार वाढविण्याबाबत सूचना दिल्या. त्याठिकाणी लक्षणे नसलेले परंतु कोरोनाग्रस्त रुग्णांना व मध्यम स्वरूपाचे लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात यावे. तसेच ज्या भागामध्ये , गावात कोरोनाचा रुग्ण आढळला त्या पूर्ण गावामध्ये, गल्लीत संबंधित ग्रामपंचायत व संबंधित नगरपालिका यांनी निर्जंतुकीकरण करून घ्यावे , कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची आरोग्याची तपासणी करावी. आरोग्य खात्याने पूर्ण जनतेचे ग्रामीण व शहरी भागांमध्ये सर्वेक्षण करावे. वय वर्ष पंचावन्न पुढील नागरिकांची वेगळी यादी तयार करावी, त्यामध्ये 55 वर्षाच्या पुढील परंतु विविध आजारांनी आजारी आहेत अशा लोकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांची आरोग्य सेवका मार्फत दररोज तपासणी करावी. नियमितपणे अशी तपासणी करताना जर कोवीड कोरोना लक्षणे आढळल्यास तात्काळ त्यांचा लाळेचा नमुना घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
तसेच कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य खात्याने अशा रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ग्रामीण भागात ग्रामसेवक व शहरी भागात मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी संयुक्तरीत्या करावे. आवश्यकता पडल्यास महसूल व पोलिस प्रशासनाची मदत घ्यायच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. आमदार उदयसिंह राजपूत यांनी कर्मचारी अधिकारी यांनी जनजागृती करून जनतेला कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभागी करून घ्यावे. रुग्णांना तातडीने उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,असे निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गोंदावले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंडाळ यांनी कोरोना बाबत मार्गदर्शन केले. बैठकीस उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते , तहसीलदार संजय वारकड , उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश सातव, केतन काजे , काकासाहेब तायडे ,गटविकास अधिकारी डॉ श्रीकृष्ण वेणीकर, डॉ. देगावकर,अधीक्षक (ग्रामीण रुग्णालय), वैद्यकीय अधिकारी प्रवीण पवार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लांजेवार, पोलीस निरीक्षक(शहर) रामेश्वर रेंगे, सुनील नेवसे पोलीस निरीक्षक (ग्रामीण), सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार पिशोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी ,नंदा गायकवाड, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment