महसूल राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांचे प्रशासनाला निर्देश
सिल्लोड । वार्ताहर
औरंगाबादच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. पुढील महिन्यात याचा प्रादुर्भाव वाढू शकतो, कोरोनाचा पुढील धोका लक्षात घेता यासाठी महसूल, जिल्हा परिषद, आरोग्य आणि पोलीस विभागाने एकमेकात समन्वय साधून खबरदारीचा उपाय म्हणून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी विविध प्रशासकीय अधिकार्यांना दिले. औरंगाबादच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (दि.1) रोजी सिल्लोड येथील शेवंताबाई मंगल कार्यालयात सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकार्यांना मार्गदर्शन करताना ना.अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प.च्या समाज कल्याण सभापती मोनालीताई राठोड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, सिल्लोड पंचायत समिती सभापती डॉ. कल्पना जामकर, सोयगाव पंचायत समिती सभापती रसुलबी पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की, महसूल ,आरोग्य, पोलीस व इतर विभागांच्या अधिकार्यांनी लॉकडाऊन काळात कोरोनाला रोखण्यासाठी केलेले कार्य अभिनंदनीय आहे. त्यांच्या परिश्रमामुळे आतापर्यंत आपण कोरोनाला रोखू शकलो. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी सुयोग्य नियोजन केले. कोविड चा सामना करीत असताना जिल्हाधिकारी यांचे सहकार्य लाभले . सिल्लोड नगर परिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. सिल्लोड शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुबलक प्रमाणात सॅनिटायझर तसेच हायपोक्लोराईड उपलब्ध करुन दिले असल्याचे ना.अब्दुल सत्तार म्हणाले. सिल्लोड नगरपरिषदेने शहरात निर्जंतुकीकरण करून नागरिकांना मास्क व साबणाचे घरपोच वाटप केले. सोबत शहर नियमित स्वच्छ ठेवण्याचे काम केले. कोविड च्या लढाईत आशा सेविका, होमगार्ड ,अंगणवाडी सेविका यांनी मिळत असलेला मानधनाचा विचार न करता आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावले असे सांगत एकीकडे टप्प्याटप्प्याने अनलॉक होत आहे तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत . यामध्ये काम करीत असताना अधिकारी-कर्मचार्यांनी स्वतःची खबरदारी घेणे गरजेचे आहे कोरोनाचे संक्रमण थांबवायचे असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे हा संदेश लोकांमध्ये रुजवीने गरजेचे आहे असे स्पष्ट करीत एक टीम म्हणून काम केल्यास कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकतो . कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण प्रभावी नियोजन करा. कोविड योद्धाना सुरक्षा साहित्य व यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी ना.अब्दुल सत्तार यांनी दिली.
सिल्लोड-सोयगावच्या चारही भागांत कोविड सेंटर चे नियोजन करा-जिल्हाधिकारी
कोरोनाला रोखण्यासाठी ना. अब्दुल सत्तार यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आपल्या दारी यासारखे विविध उपक्रम राबवून सिल्लोड सोयगावच्या नागरिकांच्या त्यांनी तपासण्या करून घेतल्या. विविध उपक्रम त्यांनी राबविल्याने आतापर्यंत या भागातील नागरिक कोरोना पासून सुरक्षित होते. आता ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. सिल्लोड व सोयगाव येथे कोविड सेंटर उपलब्ध आहेत. मात्र जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर मोठी समस्या निर्माण होवू शकते यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोयगावच्या सावळतबारा , बानोटी, तसेच सिल्लोडच्या शिवना आमठाना, अंधारी व इतर ठिकाणी कोविड सेंटरचे नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी अधिकार्यांना दिल्या. तर जास्तीत जास्त तपासणी करून संशयित रुग्णाना त्वरित क्वारंटाइन करावे, लक्षण असलेल्या किवा पॉझिटीव्ह च्या संपर्कातील लोकांचे स्वँब घेताना स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच घेतलेले स्वँबचे 24 तासाच्या आत रिपोर्ट येतील यासाठी नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रसंगी दिल्या. ग्रामीण भागातील लोकांनी नियमांचे पालन केल्यानेच आता पर्यंत कोरोना पासून सुरक्षित आहेत. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना व यातील नियम हे सगळ्यांसाठी नवीन आहेत.त्यामुळे पोलिसांनी लोकांना प्रेमाने समनव्य साधून याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी उपस्थित पोलीस अधिकार्यांना केले. बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी प्रास्ताविक करतांना सिल्लोड सोयगावचा आढावा सादर केला. पुरवठा नायब तहसिलदार संजय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी आभार मानले.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.घोलप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सिल्लोड ग्रामीणचे एपीआय किरण बिडवे, सोयगाव चे पोलीस निरीक्षक श्री सिरसाट, अजिंठा एपीआय किरण आहेर, फरदापुरचे एपीआय श्री बहुरे, सिल्लोड न.प.चे मुख्याधिकारी सय्यद रफिक, तालुका आरोग्य अधिकारी रेखा भंडारी, तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी, यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, कृउबा समितीचे सभापती अर्जुन गाढे,उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. संजय जामकर, सुदर्शन अग्रवाल,बाजार समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, रघुनाथ घरमोडे, धैर्यशील तायडे, नगरसेवक राजू गौर आदींची उपस्थिती होती.
Leave a comment