औरंगाबाद । वार्ताहर
खाजगी कोवीड रूग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत कक्षाची स्थापना केली आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मानकानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील कमलनयन बजाज रूग्णालय, डॉ.हेगडेवार रुग्णालय, एम.जी.एम.रूग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय या चार खाजगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोवीड रूग्णालय म्हणून घोषित केले आहे.
या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे. त्यांच्याकरीता मदत कक्ष स्थापन करण्यासाठी महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार कमलनयन बजाज रूग्णालयात श्रीमती योगिता खटावकर ,श्री.रामेश्वर लोखंडे, डॉ.हेगडेवार रुग्णालयात श्री.प्रमोद गायकवाड, श्रीमती कविता गडप्पा, एम.जी.एम.रूग्णालयात एस.एम.सोळोख,श्री.अरविंद धोंगडे आणि सेठ नंदलाल धूत रुग्णालयात सुनील गायकवाड, श्री.प्रदिप आखरे यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. या आदेशान्वये संबंधितांनी उपरोक्त रुग्णालयांच्या प्रथमदर्शनी भागात मदत कक्षाची स्थापन करावयाची आहे. त्याद्वारे येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना सर्वतोपरी मदत व आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. मदत कक्ष सकाळी सात ते रात्री नऊ यावेळेत सुरू राहील.
Leave a comment