औरंगाबाद । वार्ताहर
बिडकीन येथे 500 एकर जागेवर फूड पार्क उभारण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 महिन्यापुर्वी केली. त्यानुसार ऑरिक सिटी प्रशासनाने फूड पार्कच्या कामाचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष जागा विकसित करण्यास सुरूवात केली, ही समाधानकारक बाब असून शेतकर्यांसाठी हा फुड पार्क उत्तम पर्याय ठरेल, त्यादृष्टीने गतीमानतेने येथील कामे उत्कृष्टरित्या पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बिडकीन येथील फूडपार्क कामाबाबत आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे राज्याचे उद्योग सचिव वेणूगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगण, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा ऑरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच इतर अधिकारी यांची उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत ज्याप्रमाणे देशभरात एक आदर्श उदाहरण ठरली आहे. त्याचप्रमाणे बिडकीन फुडपार्कची उभारणी उत्कृष्टरित्या करावी. औरंगाबाद हा कृषी प्रधान जिल्हा आहे. येथील शेतकरी कापूस, मका, सोयाबिन, डाळिंब, शेवगा यासह विविध फळपीके, भाज्या यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. यासोबतच याठिकाणी तुती लागवड मोठ्या प्रमाणात केल्या जाते. मात्र त्यातील रेशीम कोषातून धागा तयार करण्यासाठी कोष बँगलोर येथे पाठवावे लागतात. या सर्व पार्श्वभुमिवर बिडकीन फुडपार्कमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना, बचतगटांना, नवउद्योजकांना अन्नधान्य प्रकियांचे उद्योग करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. जेणेकरून शेतीव्दारे नविन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्यांना आर्थिक लाभ घेता येईल. त्यांचा शेतीमधील उत्साह वाढेल. पर्यायाने शेती टिकून राहण्यासाठी, शेतकरी सुरक्षित होण्यासाठी या सर्वांचा फायदा होईल. या व्यापक उद्देशातून फूडपार्कचे महत्व लक्षात घेऊन फूडपार्कची उत्तम उभारणी करावी, अशा सूचना श्री. देसाई यांनी केल्या. एकूण 517 एकर जागेवर हा फूड पार्क उभारला जाणार असून यापैकी 60 एकर जागा ही विकसित आहे तर 457 एकर जागा अविकसित आहे. या संदर्भातील आराखडा, प्लॅनिंग उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सादर करण्यात आले. यावेळी श्री. देसाई यांनी दिलेल्या सूचनेनूसार लवकरच विकास कामाला सुरूवात होईल व जानेवारी अखेरीस हा फूड पार्क लोकार्पण करण्यात येईल, असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगण यांनी सांगितले. फूडपार्कच्या आराखड्याबाबत ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी माहिती दिली. श्री. काटकर यांनी फूडपार्कमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार्या सोयीसुविधांबद्दल माहिती दिली.
Leave a comment