औरंगाबाद । वार्ताहर
सातारा परिसर, संग्राम नगर येथील भगवान बालिकाश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून श्रीनिवास स्पोर्ट्स तर्फे सोशल डिस्टंसिन्ग अर्थात योग्य अंतर ठेवून योग वर्गाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम श्रीनिवास स्पोर्ट्स चे सचिव श्रीनिवास मोतीयेळे, सह सचिव निखिल पवार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात, महत्व आणि लॉकडाउनमध्ये मनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी योगाचे महत्व पटवून दिले.
तसेच भस्त्रिका प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, कपाल भाती, उदगीथ प्राणायाम घेण्यात आले, नंतरच्या सत्रामध्ये पद्मासन, वज्रासन, पर्वतासन ही आसने व त्यांची उपयुक्तता सांगण्यात आली, तसेच माजी पोलीस आई.पी.एस अधिकारी किरण बेदी यांच्यासारख्या अनेक यशस्वी महिला यांची उदाहरणं देण्यात आली जेणेकरून येथील विद्यार्थीनींना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल. या प्रसंगी भगवान बालिकाश्रम च्या संचालिका कविता वाघ, नितीन घुगे, फोटोग्राफर किशोर खरात आदी उपस्थित होते. या उपक्रमाला शिवछत्रपती पुरस्कार विजेते व श्रीनिवास स्पोर्ट्स चे अध्यक्ष डॉ उदय डोंगरे, कार्यकारी अध्यक्ष अभय देशमुख, उपाध्यक्ष डॉ.संदीप जगताप, कोषाध्यक्ष डॉ.रोहित गाडेकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
Leave a comment