औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रात कोरोनाच्या प्रसाराच्या निर्बंधाकरीता प्रत्येक नागरिकांनी स्वत:चे संरक्षण करावे. जेणे करुन सर्वांचे संरक्षण होण्यास मदत होणार असल्याने प्रत्येकांनी सजग नागरिकांची भुमिका स्वीकारण्याचे आवाहन अप्पर आयुक्त डॉ.विजयकुमार फड यांनी आज येथे केले. नक्षत्रवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास डॉ. फड यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, वार्ड अधिकारी संतोष ढेगळे, आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना तातेड, यांची उपस्थिती होती. त्यानंतर बीड बायपास रोडवरील सिल्कमिल कॉलनीतील नियुक्त कर्मचार्यांना मार्गदर्शन करुन नागरिकांशी संवाद साधताना डॉ. फड म्हणाले की, आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या हातात असून, प्रत्येकाने स्वत:चे संरक्षण केल्यास आपोआप आपल्या कुटुंबियाचे ही संरक्षण होणार आहे.
आपले संरक्षण झाल्यास आपोआप आपले शेजारी ही सुरक्षित राहतील आणि यातूनच समाजाचे संरक्षण होऊन कोरोनाला आपणास हद्दपार करता येणार आहे. याकरीता नागरिकांनी कोरोनाची भिती न बाळगता वांरवार साबणाने हात धुणे, शारिरिक अंतर पाळणे, शासनाच्या तसेच आयुष मंत्रालयाच्या सुचनाचे पालन करणे, आरोग्य वर्धक आहाराचे सेवन करणे, योग्य विश्रांती घेणे, एमएचएमएच माझे आरोग्य माझ्या हाती या पचा वापर करणे, वयोवृद्ध व आजारी व्यक्तीनी अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडणे, कोरोना विषाणुची बाधा होऊ नये या दृष्टीकोनातून घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करुन, आरोग्याच्या तपासणी करीता येणार्या कोरोना योध्यांना म्हणजेच सर्वेक्षण करणार्या कर्मचार्यास सर्वेतोपरी सहकार्य करावयाचे आहे. या सर्वेक्षणाकरिता शिक्षक, अन्य विभागाचे कर्मचारी आणि आशा वर्कस यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. असे सांगून श्री. फड म्हणाले की, नागरिकांनी आजार अंगावर काढू नये, तसेच घरातील आजारी व्यक्तीची माहिती देखील लपवून ठेवू नये. कोरोना प्रसार प्रतिबंध करण्याकरीता कोरोना योध्यांना सहकार्य करावयाचे आहे. यावेळी डॉ. फड यांनी पुंडलिकनगर येथील श्रीकृष्णनगर, देवळाई परिसर, इटखेडा, जवाहर कॉलनी, आदी भागात प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेत याकामी कोरोना योध्दयांना प्रोत्साहीत केले.
Leave a comment