सिमेंट रस्त्याचे बोगस काम;हनुमान मंदिरासमोर थुंबले सांडपाणी
फर्दापूर । वार्ताहर
नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट रोडमुळे फर्दापूर (ता.सोयगाव) येथील प्रभाग क्रमांक 4 मधील प्राचीन हनुमान मंदीरा समोर गावातील गटारीचे दुर्गंधी युक्त सांडपाणी साचल्याने संतप्त झालेल्या नागरीकांनी दि.18 गुरुवार रोजी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून सदरील रोडचे काम बोगस पध्दतीने झाल्याचा आरोप करीत या बोगस कामाच्या चौकशी ची मागणी केली यावेळी ग्रा.पं चे पदाधिकारी उपस्थित नसल्याने सुमारे दोन तास नागरीकांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडून येथे हजर असलेल्या सदस्यांना चांगलेच धारेवर धरले शेवटी मंदीरा समोरील सिमेंट रोडचे काम व्यवस्थित करुन देण्याचा आश्वासन उपस्थित सदस्य व माजी सरपंचानी दिल्याने हा तिढा तात्पूरता सुटल्याचे दिसून आले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की फर्दापूर येथील प्रभाग क्रमांक 4 मधील प्राचीन हनुमान मंदीरा कडे जाणार्या रस्त्यावर चार लक्ष रुपये किमंतीच्या सिमेंट रोडचे बांधकाम करण्यात आले आहे सदरील रस्ता दहा फुट रुंद असतांना ही येथील प्राचीन हनुमान मंदीरा समोरील रस्त्यावर केवळ पाच फुट सिमेंटचे बांधकाम केल्याने व रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे बांधकाम न करण्यात आल्याने या बोगस कामामुळे गावातील गटारीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी मंदीरा समोर येवून थुंबले या प्रकारामुळे मंदीरात दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याने गावातील एका व्हाटस प गृपवर या बाबीचा निषेध व्यक्त करुन नागरीकांन मध्ये वादळी चर्चा घडून आली दरम्यान गुरुवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास संतप्त नागरीकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून या सिमेंट रस्त्याचे काम बोगस करण्यात आल्याचा आरोप करुन या बोगस कामाच्या चौकशी ची मागणी लावून धरीत सुमारे दोन तास ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला दरम्यान यावेळी ग्रामविकास अधिकारी उपजिल्ह्या अधिकार्यांच्या दौर्यात गुंतल्यांने व सरपंच व उपसरपंच गैरहजर असल्याने नागरीकांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असलेल्या ग्रा.पं सदस्यांनाच धारेवर धरुन त्यांच्या समोर या बोगस कामा बाबत तक्रारीचा पाढाच वाचला शेवटी मंदीरा समोरील सिमेंट रस्त्याचे काम व्यवस्थित करुन देण्याचे आश्वासन माजी सरपंच विठ्ठल आगळे, सदस्य फिरोज पठाण,विलास वराडे,भीमराव बोराडे यांनी नागरीकांना दिल्याने हा तिढा तात्पूरता सुटल्याचे दिसून आले असले तरी या बोगस कामाची चौकशी होत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा ही येथील काही नागरीकांनी घेतल्याचे दिसून आले आहे.
Leave a comment