सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा, 30 जुलैपर्यंत मिळणार लाभ
बोरगांव बाजार । वार्ताहर
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता नैसर्गिक व सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. जनआरोग्य योजना लागू केलेल्या रुग्णालयात या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा काळामध्ये सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ खासगी रुग्णालयातील प्रसूत मातांनाही देण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत शासकीय रुग्णालयामध्येच ही योजना राबविण्यात येत होती; मात्र आता खासगी रुग्णालयात सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचा काळ मर्यादित असून, 30 जुलैपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. भविष्यात या योजनेला मुदतवाढ सुद्धा मिळणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची कल्पना ग्रामीण भागामध्ये नसल्याने त्याबाबतीत आता जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. तर दुसर्या बाजूला खासगी दवाखाने मात्र याचीही जाहिरातबाजी करताना दिसत आहेत. शासनाच्या योजनेच्या नावाखाली स्वतः समाजसेवा करीत असल्याचा संदर्भ देताना दिसत आहेत. मोफत प्रसूतीच्या नावाखाली स्वतःच्या रुग्णालयाचा प्रतिमा वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न काही दवाखाने करताना दिसत आहे. जाहिरात करताना शासनाच्या योजनेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. मात्र, तसा उल्लेख न करता त्या योजनेच्या माध्यमातून शासनाकडून पैसा घेऊन असे दवाखाने सामाजिक काम करीत असल्याचे सांगितले जात आहेत. ज्या खासगी रुग्णालयात प्रसूती केली जाणार आहे त्या रुग्णालयात प्रसूती नैसर्गिक झाल्यास त्यासाठी शासनाकडून आठ हजार रुपये, तर सिझेरियनसाठी 17 हजार रुपये शासन त्यांना देऊ करणार आहे. असे असतानाही सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली मोफत प्रसूती करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Leave a comment