बीड । वार्ताहर
बीड तालुक्यातील मांजरसुंब्यालगतच्या ससेवाडी गावच्या पाठीमागील डोंगरमाथ्यावर दुचाकीवरुन आलेले दोघे जण दुचाकी सोडून पळू लागल्याने ते बहुधा कोरोना संशयित असल्याचा समज करुन घेत परिसरातील तरुणांनी त्यांना थांबवत नंतर महामार्ग पोलीसांच्या स्वाधीन केले. बुधवारी (दि.8) दुपारी 4 वाजेच्या समारास हा प्रसंग घडला. दरम्यान एक जण डोंगरावरुन पळत गेला.
झाले असे की, मांजरसुंबा गावापासून 1 कि.मी अंतरावर ससेवाडी हे गाव आहे. या ठिकाणी बुधवारी दुपारी काही तरुणांना एका दुचाकीवर दोघे जण गावातून पुढे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते तरुण त्यांच्या दिशेने धावू लागले. एव्हाना तरुण मागे का येत आहेत या भितीपोटी दुचाकीवरील ते दोघे काही अंतरापर्यंत दुचाकीवरुन निघून गेले. तिथे दुचाकी सोडून देत त्यांनी डोंगराच्या दिशेने पळ काढला. यामुळे तरुणांचा संशय आणखीन बळावला. ते कोरोना संशयित असू शकतात, म्हणूनच आपल्याला पाहून पळत आहेत असा समज करुन घेत काही जणांनी ही माहिती मांजरसुंबा महामार्ग पोलीसांना दिली. नंतर पोलीसही वाहनासह ससेवाडी गावानजिकच्या डोंगराच्या दिशेने दाखल झाले. तिथे एका तरुणास त्यांनी सोबत येण्याचे सांगतीले. दरम्यान संबंधिताची आरोग्य तपासणी करण्यासाठी रुग्णालयात पाठवले जाणार असल्याचे पोलीसांनी सांगीतले. एकंदरच कोरोनाची धास्ती सार्यांनीच घेतली असून ग्रामीण भागात अनोळखी कोणी दिसल्यास आणखी संशय व्यक्त होत असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाले.
Leave a comment