मंठा । वार्ताहर
कोरोनाच्या गंभीर संकटामुळे देशातील गरीब, मजूर, शेतकरी, कामगार तसेच छोटे व्यावसायिक आर्थिकदृष्टया अडचणींचा सामना करत आहेत. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत केंद्र सरकारने समाजातील या घटकांना रोख आर्थिक मदत करणे आवश्यक आहे असे आ. राजेश राठोड यांनी म्हटले आहे.
केंद्रातील भाजपा सरकारने दारिद्रयरेषेखालील गरीब कुटूंबाना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख द्यावेत, त्याचप्रमाणे मनरेगा अंतर्गत मजुरांना 100 ऐवजी 200 दिवस कामाची हमी द्यावी किंवा तितक्या दिवसाचे वेतन द्यावे. शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना तसेच भटक्या विमुक्तांना विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी आ.राजेश राठोड यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आज लोकांच्या हाताला सध्या रोजगार नाही, शेतकरी शेतमालाला भाव नसल्याने त्रस्त झाला आहे म्हणून या सर्वांना तातडीने आधार देण्याची गरज आहे. गरीब कुटुंबाला रोख 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करून काँग्रेस पक्षाने सुचविल्याप्रमाणे न्याय’ योजनेला धरून पुढील सहा महिन्यांसाठी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला 7500 रुपये जमा करावेत. यासोबतच लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देण्यापेक्षा थेट आर्थिक सहाय्य करावे, जेणेकरून मध्यम वर्गातील लोकांच्या हातातही पैसा जाईल.राज्यातून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात, त्यांच्या घरी जाण्यासाठी प्रवास खर्चासह इतर सर्व खर्च केंद्रातील सरकारने करावा. श्रमिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. राष्ट्र उभारणीत शेतकरी, कामगार आणि मजुरांचा मोठा सहभाग असतो. परंतू आता हाच वर्ग संकटात असताना त्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी केंद्र सरकारने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे शेवटी आ. राठोड यांनी सांगितले.
Leave a comment