रुग्णांना उपचारासोबतच पौष्टीक आहार देण्याचे निर्देश
जालना । वार्ताहर
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दि. 27 मे रोजी रात्री उशिरा जालना येथील कोव्हीड हास्पीटलला आज भेट देत रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती अधिकार्यांकडून घेत रुग्णांच्या प्रकृतीमध्ये त्वरेने सुधारणा होण्यासाठी रुग्णांना औषधोपचाराबरोबरच पौष्टीक आहार देण्याचे निर्देश दिले. या भेटीप्रसंगी मंत्रीमहोदयांसमवेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोव्हीड रुग्णालयासंदर्भात माहिती घेताना पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोव्हीड बाधितांना तातडीने उपचार मिळावेत या उद्देशानेच अत्यंत कमी कालावधीमध्ये या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या कोव्हीडबाधित रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार देण्याबरोबरच रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये पौष्टीक अशा बाबींचा समावेश करण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकार्यांना दिले.
जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळाव्यात यादृष्टीकोनातुन आवश्य त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असुन निधीची कमतरता भासु दिली जाणार नाही. रुग्णालयास आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत असुन रुग्णालयासाठी आवश्यक तंत्रज्ञही तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना त्यांनी यावेळी दिले. कोव्हीड रुग्णालयासाठी तातडीने दोन हजार पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या निर्देशानुसार रुग्णांना आवश्यक त्या औषधोपचाराबरोबरच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक असल्याने या रुग्णांसाठी संतुलित आहाराचा दिनक्रम ठरविण्यात आला आहे. रुग्णांना दोन वेळेत वरण, भात, भाजी, पोळी याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यामध्ये मदत करणारे उकडलेले अंडे, गुळ, शेंगदाणे, सोयाबीन वडी, दुध याबरोबरच प्रोटीनचा भरपुर समावेश असलेल्या थ्रेप्टीन बिस्कीटांचाही या रुग्णांच्या आहारामध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी मंत्री महोदयांना दिली.
Leave a comment