दहा आरोग्य पथके लागली कामाला
बीड । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एक संशयीत कोरोना बाधित असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाल्यानंतर आता पिंपळा व परिसरातील गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत दरम्यान या परिसरातील एकूण 2103 घरांचे सर्वेक्षण केले गेले त्यामध्ये एकूण 9476 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी सांगीतले.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सतर्कता म्हणून आता आष्टी तालुक्यातील पिंपळा गावापासून आजूबाजूच्या तीन किलोमीटरवरील सूंबेवाडी, धनगरवाडी ,काकडवाडी, खरडगव्हाण हा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान पिंपळा परिसरातील 879 घरांचे सर्वेक्षण 10 आरोग्य पथकामार्फत केले जाईल. दररोज शंभर घरांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये ताप,सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना उपचारासाठी विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले जाणार आहे तसेच गरज पडल्यास सात कि.मी. परिसरातील गावांमध्ये देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील असे बुधवारी सकाळीच जाहीर केले गेले होते. त्यानंतर 3 ते 7 कि.मी. परिसरातील घरांचे सर्वेक्षणही सुरु केले गेले. बुधवारी सायंकाळपर्यंत पिंपळा परिसरातील पिंपळा,धनगरवाडी,काकडवाडी, खरडगव्हाण,सुंबेवाडी या गावातील एकूण 2103 घरांचा सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण 9476 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आरोग्य पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, 20 आरोग्य कर्मचारी, एक शिक्षक यांचा समावेश आहे.
Leave a comment