आष्टी तालुक्यातील पिंपळा गावासह परिसरात घरोघरी सर्व्हेक्षण
आष्टी, बीड । वार्ताहर
एकही कोरोना पॉझिटिव्ह नसलेल्या बीड जिल्ह्यात आता आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे बुधवारी (दि.8) एक 63 वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून त्या रुग्णावर सध्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील अन्य चार जणास खबरदारी म्हणून बुधवारी पहाटे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयाचा वॉच आहे.त्यामुळे या गावच्या परिसरातील दहा गावे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
कोरोनाचा उपचार व प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना बीड जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील अलमगी येथील एका रुग्णाचा 4 एप्रिल रोजी घेतलेला थ्रोट स्वॅब नमुना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील आष्टी तालुक्यातील मौजे पिंपळा येथील दोन संपर्कातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले. पैकी एका 63 वर्षीय व्यक्तीाचा स्वॅब नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातून बुधवारी सायंकाळपर्यंत तपासलेल्या 101 थ्रोट स्वॅब नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आढळून आलेले आहेत. यात या बाधीतासह एका संशयिताच्या संपर्कात आलेल्या तिघांचे रिर्पोटही निगेटिव्ह आले आहेत.कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गरज पडल्यास पिंपळा गावाच्या 7 कि.मी.परिसरातील गावांमध्ये देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू करण्यात येत असून सर्व्हेक्षणही केले जात आहे. दरम्यान गावात बाहेरुन येणार्यास व गावातील व्यक्तीला बाहेर जाण्यास पुर्ण प्रतिबंध घालण्यात आला आहे. सर्व लोकांना घरातच राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. साथरोग कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कडक कार्यवाही केली जाणार असल्याची ताकीदही दिली गेली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही याची प्रशासनामार्फत खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली.
कुटूंबातील तिघांसह सहाजणांचे विलगीकरण
दरम्यान पिंपळा येथील पॉझिटिव्ह रुणाच्या कुटूंबातील 3 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील आणखी 3 व्यक्तींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आज त्यांचे रिपोर्ट प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
लक्षणे आढळल्यास विलगीकरण कक्षात पाठवणार
आरोग्य पथकांमार्फत केल्या जाणार्या सर्व्हेक्षणामध्ये या गाव परिसरात ताप,सर्दी,खोकला व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना उपचार व गरजू रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले जाणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले.
Leave a comment