बीड । वार्ताहर
धर्मप्रसारासाठी बीड शहरात आलेले 24 जण लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अडकून पडले होते. ते शहरातील सहा धार्मिकस्थळांमध्ये आश्रयाला असून प्रशासनाने त्यांची नोंद घेतली होती. दरम्यान, बुधवारी (दि.8) जिल्हा रुग्णालयात त्या सर्वांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
धर्मप्रसाराच्या कामासाठी परराज्यासह परजिल्ह्यातील 24 नागरिक बीडमध्ये आले होते. शहरातील सहा धार्मिकस्थळांमध्ये ते मुक्कामी होते. याच दरम्यान देशभर टाळेबंदी, संचारबंदी जाहीर झाली. त्यामुळे या सर्वांना बीडमध्येच रहावे लागले. स्थानिकांनी प्रशासनाला याची माहितीही दिली होती. ‘सोशल डिस्टन्स’ ठेऊन राहण्याची संमती त्यांना दिली होती, शिवाय त्यांची तपासणीही करण्यात आली होती. ते सर्व जण ठणठणीत असल्याची माहिती आहे. मात्र, खबरदारी म्हणून 14 दिवसानंतर बुधवारी त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात बोलावून नियमित तपासणी करण्यात आली आहे. त्या सर्वांची ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ जाणून घेऊन आवश्यकतेनुसार त्यांच्या उपचाराबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
अफवांवर विश्र्वास ठेऊ नये
सर्वजण आधीपासूनच बीडमध्ये-भास्कर सावंत
बीडमध्ये 24 जण टाळेबंदी जाहीर होण्याच्या आधीपासूनच आलेले आहेत. त्यांनी प्रशासनाने नोंद घेतलेली असून बुधवारी त्यांना नियमित तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते. नागरिकांनी अफवांवर विश्र्वास ठेऊ नये असे आवाहन पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी केले.
Leave a comment