गेवराई । वार्ताहर
ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीने संसारातल्या माणसाच्या आयुष्यात कडूपणा येऊ नये म्हणून धावा केला. त्यामुळे माणसाने माणसाला शोभेल असे वागावे, कारण सभ्यतेने स्वतःला आनंद मिळतो. उद्धटपणा स्वतःला आणि इतरांना संकटात आणतो. म्हणून, प्रत्येकाने ज्ञानेश्वरीला आपलेसे करावे, कारण ज्ञानेश्वरी माणसाला सभ्यता शिकवते, असे विचार भगवान गडाचे मठाधिपती डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी येथे बोलताना व्यक्त केले. मंगळवार दि. 7 रोजी सायंकाळी सहा वाजता झालेल्या मन मंदिरा-गजर भक्तीचा, या कार्यक्रमात एका वृत्तवाहिनीवर ते दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते. डॉ. नामदेव शास्त्री यांनी ज्ञानेश्वरी भावकथा, आनंदाचे सिद्धांत, या विषयावर निरूपण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्ञानेश्वरी हे अलौकिक साहित्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा म्हणतात की, तुम्ही मनाशी बोला, मन मोठे होईल. जगाकडे लक्ष देऊ नका, अप्रतिम असा आनंद तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आपण खरेच बोलावे रागाने बोलू नये, मी पंधरा वर्षे झाले भगवानबाबांच्या गादीवर तुमच्या आशीर्वादाने बसलो आहे. आलेल्या प्रत्येकाला विचारतो की, बाबा काय म्हणायचे. उत्तर मिळाले ते असे, बाबा हसून प्रत्येकाचे स्वागत करायचे. कसा आहेस एवढेच विचारायचे. हिताहित देखती तो साधू , असा दृष्टांत सांगून ते म्हणाले की, भक्तांच्या हिताचा विचार करणारा खरा साधू आहे. पाप न करणार्यांच्या चेहर्यावर तेज असते. त्यामुळे अयोग्य वागू नका , त्याचा आनंद तुमच्या चेहर्यावर दिसून येतो. अनुसया ही जगातील पहिली पतिव्रता असल्याचे त्यांनी सांगितले. दंडकारण्यात अनुसया आणि अत्रीऋषी राहात होते. तिथे राम-लक्ष्मण-सीता यांच्याशी त्यांची भेट झाली. तिने सितेची परिक्षा घेतली. त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली. तिने सितेला दिव्य चोळी भेट दिली. त्यामुळेच अनुसयेच्या सावलीत सुरक्षित रहाण्याचं भाग्य मिळाले. अनुसया मला भेटणे,ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असल्याचा अभिप्राय सितेने नोंदविला असल्याचे ते म्हणाले. नवर्याने बायकोला केलेला इशारा समजतो. ती बायको, आता सांगून ऐकत नाही त्याला आपल्याकडे उत्तर नाही अशी मिश्किल टिप्पणी ही डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी केली. माणुस सन्मानाला हपापलेला असून, एखाद्याने लवकर चहा दिला परंतु मान दिला नाही तर लगेच राग येतो. परंतु मोठ्या हॉटेलात चहा उशिरा मिळतो. मान अगोदर मिळतो. चहा चा पत्ता नाही, तरीही तक्रार नाही. कारण मान दिला ना, असा घोळ जीवनात झालेला आहे. त्यामुळे विचार संतांकडून पारखून घ्यावेत. लोक काय म्हणतात त्याचं काही खरं नाही. म्हणून, चांगल्यांची संगत करा, चुकीचं वागू नका, त्याचा पश्चाताप करायला तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि लोक मग तुम्हाला वेड ठरवतील. संत सुखाचा मार्ग दाखवतात. लोकांना झालय काय की, जे दुखी आहेत त्यांना सुख मागतात. ज्यांना ज्ञान नाही त्यांच्याकडून ज्ञान मागता. तुम्ही योग्य ठिकाणी जा, म्हणजे ज्ञानेश्वरी कडे जा, तुम्हाला सुखाचा मार्ग ज्ञानेश्वरी दाखवते. शब्द जैसे अमृताचे असा संदर्भ देत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले की,ज्ञानोबा संसारातला कडूपणा माणसाला मिळू नये यासाठी आयुष्यभर स्वतःला झोकुन दिले. मन चंचल आहे. मन शांत व्हावे, तुम्ही तुमचं मन प्रसन्न करायचा प्रयत्न केला का असा प्रश्न त्यांनी विचारला. मन म्हणजे अनुभव आहे. मनाने दुःख दिले ते तुम्हाला कळले का हेच महत्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले. सत्य बोलणार्यांशी मैत्री करा, चुकीचं करतो ते मनाला कळत तुमचे नियंत्रण सुटले, की दुःख सुरू झालेच समजा. चित्रपट खोटा खोटा असतो, परंतु लोकांना आवडते. चित्रपटात, लोकांना जे आवडते, ते देत राहतात. असो,अग्नी जळतो हे सगळ्यांना माहीत असते परंतु अग्नीचे प्रमाण ठेवले की स्वयंपाक सुगरणीचा झाल्याशिवाय राहत नाही, असे ही त्यांनी शेवटी सांगितले.
Leave a comment