परतुर । वार्ताहर
शेगाव पंढरपूर या सिमेंट हायवे चे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात आल्या होत्या, परंतु काम दर्जेदार झाल्याचा आव आणणार्या कंत्राटदार कंपनीने अखेर दुरुस्ती सुरु केल्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहे. शेगाव पंढरपूर हायवे चे काम अनेक ठिकाणी बोगस झाल्याने रस्त्याला भेगा पडल्या होत्या, याबाबत अनेकांनी तक्रारी ही केल्या होत्या ,वर्तमानपत्रातून बातम्या आल्यानंतर ही संबधीत कंत्राटदार कंपनी मात्र हे मानायला तयार नसताना गेल्या काही दिवसात मात्र भेगा पडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे. वाटूर परतुर रोडवर अनेक ठिकाणी भेगा पडलेला सिमेंट रस्ता उखडून टाकण्यात आला असून त्या जागी आता नव्याने रस्ता तयार करण्यात येणार आहे.
या संदर्भात आमदार बबनराव लोणीकर यांनीही नुकतीच तक्रार दिली होती, आता हे काम बोगस झाल्याचे स्पष्ट झाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण वाटूर येथील या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन समारंभात गडकरी यांनी काम बोगस झाल्यास कंत्राटदार यांना जेसीबी खाली गाडू असे म्हटले होते. भेगा पडलेल्या रस्त्याची दुरुस्ती तर सुरू झाली पण या कामासोबत रस्त्याच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या नाल्या चे काम ही निकृष्ट करण्यात आले आहे तसेच मध्यभागी लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट पोल ही तितके मजबूत बसवण्यात आलेले नसल्याने या कामाचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे. याच रस्त्यावर फुटपाथ वर ठोकळे बसवण्याचे काम सुरू आहे ते कामही बरोबर केले जात नसल्याने एकूण ही मेघा कंट्रक्शन कम्पनी संशयाच्या भोवर्यात आहे.
Leave a comment