आता सकाळी 7 ते साडेनऊ दरम्यानच खरेदी करता येणार
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात सुरू असलेली एक दिवसाआडची संचारबंदी पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. आता आज गुरुवारपासून सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील आणि याच काळात नागरिकांना खरेदी करता येईल असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आदेशात नमुद केले आहे.जिल्हाधिकार्यांनी बुधवारी (दि.8) दिलेल्या आदेशात पुढे म्हटल्यानुसार, सम-विषम तारखेचा फॉम्यूला निश्चित करुन दिला होता. परंतु, गर्दी वाढत असल्याने संचारबंदी शिथिलतेची वेळ बदलली आहे. त्यात संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची किरकोळ विक्री करणार्या आस्थापना दि.9, 11, 13 या तारखेस सकाळी 7 ते 9.30 या वेळेत खुल्या राहतील. या काळात कोणत्याही स्वरुपात माल वाहतूक होणार नसल्याने छोटा हत्ती, पिकअप ही वाहने रस्त्यावर चालवता येणार नाहीत. तसेच, जीवनावश्यक वस्तूंसह सर्व घाऊक वितरण व दुकानदार यांची आज दि.9, तसेच 11, व दि.13 या तारखेस सकाळी 6 ते 10.30 या काळात सुरु राहतील. या काळात देखील कोणत्याही प्रकारची वाहतूक करता येणार नाही. सर्व घाऊक वितरण व दुकानदार यांनी पोलीस विभागाकडून मिळालेले पास वापरून सर्व किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक वितरक, विक्रेते यांच्याकडून आवश्यक ते सामान दि.9, 11, 13 या तारखेस सकाळी 6 ते 10 या वेळ वगळून प्राप्त करुन घ्यावे. या सवलती वगळता इतर सर्व काळात संचारबंदी असणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व 11 शहरातील व्यापारी संघटनांनी दिलेली किराणा सामानाच्या वितरकांची यादी आदेशासोबत जोडली आहे. असे जिल्हाधिकार्यांनी आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्ह्यात संचारबंदी च्या वेळेत बदल केल्यानंतर एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या वेळेत बदल केला गेला आहे.
Leave a comment