बीड | वार्ताहर
आत्तापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या बीड जिल्ह्यात आज बुधवारी (दि.8) एक 50 वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. आष्टी येथील या रुग्णावर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
आष्टी तालुक्यातील दोघे जण हे नगर येथे जमातीसाठी गेले होते.त्या दोघांनी 23 मार्चपासून नगरमध्ये मुक्काम केला होता; मात्र चार दिवसांपूर्वी हे दोघे बीड जिल्ह्यात दाखल झाले.आरोग्य प्रशासनाने नगर येथूनच त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अन्य एकाच अहवाल प्रतीक्षेत आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
दरम्यान बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आहे. बाहेरून कोणताही व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करून शकणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात असताना, बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नगरकडून याची लागण झाली . यासंदर्भात आष्टी तालुक्यातील या गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सात किलोमीटर परिसर बंद
सतर्कता म्हणून आता परिसरातील इतर गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नाही म्हणून कलम 144 नुसार पिंपळा गावाचा तीन किलोमीटर परिसर कन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. यात पिंपळा,सुंबेवाडी, धनगरवाडी,काकडवाडी,ढोबळसांगवी, खरडगव्हाण अशा एकूण सहा गावांना कन्टेन्टमेंट झोनमध्ये जोडले आहे तर कन्टेन्टमेंट झोनच्या पुढील चार किलोमीटर अंतर असलेल्या गावात बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात लोणी ,नांदूर,सोलापूरवाडी, कुंटेफल आणि कोयाळ पाच गावांचा समावेश असणार आहे. आता ही सर्व गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्ण वेळ बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Leave a comment