स्वस्त धान्य वितरणावर शिवसैनिकांनी लक्ष द्यावे सेनाभवनातून आदेश- खांडे
बीड । वार्ताहर
शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना धान्य वाटप होते की नाही याकडे जिल्हा प्रमुखांसह सर्व पदाधिकार्यांनी लक्ष देऊन सेना भवनात अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिवसेना भवनातून देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली आहे.
सध्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात आणि राज्यात लॉक डाऊन सुरू आहे. या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी राज्य सरकारने धान्य वितरण करण्याचे आदेश दिले असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे प्रशासनाच्या अधिकार्यांच्या संपर्कात असून शहरी आणि ग्रामीण भागातील व्यवस्थेवर लक्ष देऊन आहेत. काही ठिकाणी अजूनही ही नागरिकांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार येत असून स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरणामध्ये काही गडबड आढळल्यास याबाबत तात्काळ तक्रार दाखल करण्यात येईल संपूर्ण जिल्हाभरात असलेल्या वितरण व्यवस्थेवर जिल्हाप्रमुखांसह तालुकाप्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख यांनी लक्ष द्यावे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना भवनातून आले असून अधिकारी-कर्मचार्यांनी कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता सर्वसामान्य नागरिकांना ठरवून दिलेल्या नियमानुसार धान्य वितरण करावे अन्यथा माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे तक्रारीचा अहवाल देण्यात येणार आहे. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन परिस्थितीत नागरिकांना दोन घास मिळावे हीच सरकारची भूमिका आहे. यामध्ये गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. असा सज्जड दम जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला आहे. तसेच प्रशासनाच्यावतीने ज्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यावरही जिल्हा प्रमुखांनी लक्ष द्यावे असे आदेश पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
-------
Leave a comment