कोरंटाईन उसतोड मजुरांना किराणा साहित्य वाटप
माजलगाव । वार्ताहर
जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.या कोरोनाच्या लढ्यात सुदैवाने आपला जिल्हा बचावलेला आहे. प्रशासनाने घेतलेल्या सतर्कतेमुळे व काळजीमुळे यातुन आपण दुर आहोत. प्रशासनाने तालुक्यातील सोन्नाथडी येथे उसतोड मजुरांना कोरंटाईन केले असुन या कामगारांना किराणा साहित्याचे वाटप वर्गमित्रांनी केलेल्या जाणिव ग्रुपने मंगळवारी (दि.7) सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
येथील सिध्देश्वर विद्यालयातील 1989 च्या वर्गमित्रांनी व्हॉट्सअप ग्रुपवर कोरोनाच्या लढ्यात आपलाही हातभार लावावा असे आवाहन करताच जवळपास 75 हजार रूपये अवघ्या काही क्षणांत ऑनलाईन जमा झाले. यानंतर प्रशासनाची परवानगी घेत प्रशासनाने दिलेल्या यादीनुसार तालुक्यातील सोन्नाथडी येथे 37 कोरंटाईन उसतोड कामगारांना किराणा साहित्याचे वाटप केले. यावेळी नायब तहसिलदार शामसुंदर रामदासी, तलाठी रूपचंद आभारे, सरपंच प्रतिनिधी गिन्यानदेव वाघमारे यांचेसह वर्गमित्रांची उपस्थिती होती. दरम्यान तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांना तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांना सॅनिटायझरचे देखिल वाटप वर्गमित्रांनी केले.
परदेशातुन मदत-सुधीर चोपडे
नेदरलँडमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत मायदेश असलेल्या भारतातील आपल्या तालुक्यातील उसतोड मजुरांना, गरजूंना किराणा साहित्य वाटप करावे याकरीता सामाजिक भावनेतुन ऑनलाईन आर्थिक मदत केली याचा मनस्वी आनंद होतो अशी माहिती नेदरलँन्ड येथे सध्या स्थायिक असलेले वर्गमित्र सुधीर चोपडे यांनी दिली.
उपक्रमाला हातभार लावला-लक्ष्मीकांत पाटील
मुलाच्या वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळत वर्गमित्र राबवत असलेल्या उपक्रमाला हातभार लावता आला.लॉकडाउन असल्यामुळे कोरंटाईन केलेल्या मजूरांना बाजारात जाण्यासाठी देखिल परवानगी नसल्याने गरजूंना किराणा साहित्य वाटप केले आहे अशी प्रतिक्रिया वर्गमित्र लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.
Leave a comment