टाकरवण परिसरात खुलेआम शेतात पार्ट्या!
टाकरवण । वार्ताहर
संबंध भारतात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र याही स्थितीत काही लोक हा कालावधी घरात बसून व्यतित करण्याऐवजी चक्क सुट्या समजून एन्जॉय करत आहेत. पुणे-मुंबई या महानगरातून आपापल्या मूळगावी टाकरवण परिसरात दाखल झालेले काही महाभाग चक्क शेतांमध्ये पार्ट्या झोडू लागले आहेत. इथे ना सोशल डिस्टन्स ना, कोरोनाची भीती अशी मौजमजा करणार्यांना स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क होण्याची वेळ आहे, मात्र कोणीही गांभीर्याने घेताना दिसत नाही.
प्रत्येक जण कोरोनाच्या भीतीच्या सावटामध्ये असताना टाकरवण येथील नागरिक मात्र सुधरण्याचे नाव घेत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कोरोनाच्या सुट्या एन्जॉय करण्याच्या मुडमध्े आहे.मुंबई-पुण्यावरून गावी आलेले महाभाग तर शेतात जाऊन पार्ट्या करणे आणि मौज करणे असे उद्योग करु लागले आहेत.
गावातील तळीराम आपले रोजचे पेय चढ्या भावाने का होईना पण रिचवून आपली सुट्टी एन्जॉय करत आहेत. किराणा दुकानदार, घाऊक मालवाले अनेक वेळ पोलिसांचा प्रसाद घेऊनसुद्धा फायद्यासाठी नियम धाब्यावर बसवून लूट करत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. गावातील लोकांकडून मागणी होत असताना साधी निर्जंतुकीकरण फवारणी न करता सरपंच व ग्रामसेवक नुसते करणे सांगने यात धन्यता मानत आहेत.आता तरी ग्रामस्थानी या महामारीच गांभीर्य लक्षात घेऊन या सुट्या मौज मजेसाठी नाहीत हे लक्षात ठेवून वागावे अशी भावना व्यक्त होवू लागली आहे.
Leave a comment