बीड जिल्ह्याला सर्वात मोेठा दिलासा
चेकपोस्टवरील पोलीसांसह 33 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याच्या हद्दीतून लातूर जिल्ह्यात जाण्यासाठी शहागड व नंतर चौसाळा चेकपोस्टवरील पोलीस व आरोग्य कर्मचार्यांशी हुज्जत घालणार्या आठ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रविवारी (दि.5) शहागड व चौसाळा चेकपोस्टवरील 29 जणांसह अन्य 4 जणांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थान पुणे येथे पाठवण्यात आले. सोमवारी सायंकाळी या सर्वांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. अन् आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान या सर्वांना आता पुढील 14 दिवसांसाठी होम क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
लातूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या 8 जणांना बीड जिल्हा हद्दीत प्रवेश नाकारला गेला होता. शहागड तपासणी नाक्यावर त्यांनी पोलिस, शिक्षक व आरोग्य कर्मचार्यांशी प्रवेश मिळावा म्हणून हुज्जतही घातली होती. दरम्यान, ते आठजण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्यानंतर या नाक्यावरच्या 15 तर चौसाळा चेक नाक्यावरच्या 14 जणांसह इतर 4 अशा 33 जणांच्या कोरोना तपासणीचा निर्णय घेण्यात आला. रविवारी रात्री शहागड व चौसाळा चेकपोस्टवर कर्तव्यावर असणारे पोलीस, आरोग्य व शिक्षक या सर्वांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होेते. सोमवारी सायंकाळपर्यंत सर्वांचे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. ही माहिती सोशल मीडियावर कळताच प्रत्येकाने एकमेकांचे अभिनंदन केले. दरम्यान अंबाजोगाईत रविवारी रात्री दाखल असलेल्या अन्य एका संशयिताचा रिपोर्टही कोरोना निगेटिव्ह आला आहे.
एसपी म्हणाले, हिरोंना आणण्यासाठी चाललो!
‘सर्व बीडकरांचे आशिर्वाद कामाला आले. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.आम्ही आमच्या हिरोंना आणण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जात आहोत’ अशा शब्दात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आनंद व्यक्त केला. शिवाय कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या सर्व कर्मचार्यांना पुढील 14 दिवस होम क्वॉरटाईन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नागरिकांची होती प्रार्थना
दरम्यान सदैव जनतेसाठी रस्त्यावर उतरुन कर्तव्य बजावणार्या या कर्मचार्यांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह यावेत यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिक प्रार्थना करत होते. अखेर सर्वांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
आतापर्यंत 98 जणांचे स्वॅब निगेटिव्ह
बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात प्रत्येकी 100 तर केज व परळी उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी 50 खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दरम्यान आज सोमवारपर्यंत (दि.6) बीड जिल्हा रुग्णालयात 73 जणांचे तर स्वारातीमध्ये 25 अशा एकुण 98 जणांच्या घशातील लाळेचे स्वॅब राष्ट्रीय विषाणू संस्थान पुणे या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पैकी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल 73 जणांचे व अंबाजोगाईतील 25 अशा 98 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत.
Leave a comment