केज । वार्ताहर
शहरातील मंगळवारपेठ कॉर्नरलगतच्या फलोत्पादन खात्याच्या जागेत सुरु असलेला हातभट्टी दारुअड्डा व देशी दारू अड्ड्यावर केज पोलीसांनी छापा मारला. या कारवाईत देशी दारू आणि दारू बनविण्याचे रसायन नष्ट करण्यात आले. सोमवारी (दि.6) दुपारी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अर्चना भोसले यांच्यासह कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
मंगळवारपेठ कॉर्नरलगतच्या जागेत देशी दारूची विक्री व दारू निर्माण करण्याची हातभट्टी सुरू असल्याची माहिती गस्तीवरील परिविक्षाधीन उपनिरीक्षक अर्चना भोसले यांना मिळाली. नंतर त्यांनी पोहेकॉ. महादेव गुजर, पोलीस नाईक मंगेश भोले यांना सोबत घेऊन छापा मारला.
पोलिसांना पाहताच दारू पिण्यासाठी आलेले मद्यपी व गावठी दारू तयार करणारी महिला पसार झाले. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी एका प्लॅस्टिकच्या पिंपात ठेवलेले सुमारे 200 लिटर रसायन व पत्र्याच्या शेडमध्ये एका प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये जमिनीत पुरून ठेवलेली गावठी दारू तसेच दारू बनविण्याचे साहित्य पोलीसांनी नष्ट केले. उपनिरीक्षक अर्चना भोसले यांच्या फियादीवरुन केज ठाण्यात नंदाबाई राजाभाऊ पवार विरोधात दारू बंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोसले अधिक तपास करत आहेत.
Leave a comment