बिहारमध्ये जाणार्या मजुरांसाठी लवकरच रेल्वेची व्यवस्था- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना । वार्ताहर
लॉकडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकुन पडलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सोय करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील 1 हजार 200 मजुरांना नुकतेच विशेष श्रमिक रेल्वेने पाठविण्यात आले असुन आज 12 मे रोजी 1 हजार 464 मजुरांसाठी व्यवस्था करण्यात आली होती परंतू प्रवासासाठी आलेल्या 1 हजार 183 एवढ्या मजुरांना घेऊन रेल्वे उत्तरपद्रेशकडे रवाना झाली आहे. बिहार व पाटणा येथील 2 हजार 700 मजुर जालन्यामध्ये अडकलेले असुन त्यांच्यासाठीसुद्धा दोन रेल्वेचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये रेल्वेने जाणा-या मनोज कुमार यांनी साहब मै दो महिने बाद अपने गाँव जा रहा हॅू. बहोत अच्छा लग रहा है. महाराष्ट्र सरकारने हमारी बहोत मदत की अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत शिस्तबद्धरितीने नियोजन करण्यात येत असुन या कामामध्ये जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करत आहेत. दि. 10 मे रोजी उत्तरपद्रेशकडे रवाना करण्यात आलेल्या मजुरांचे जेवण, पाणी त्याचबरोबर सुरक्षिततेच्यादृष्टीने मजुरांना मास्क, सॅनिटायजर आदी साहित्य पुरवल्याबद्दल स्वयंसेवी संस्थांचे आभार व्यक्त करत बिहार राज्यातील 2 हजार 700 मजुर जालना जिल्ह्यामध्ये अडकुन पडले आहेत. या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी प्रशासनामार्फत दोन श्रमिक रेल्वेचे नियोजन करण्यात येत आहे. बिहार राज्य सरकारकडून परवानगी मिळताच मजुरांना श्रमिक रेल्वेच्या माध्यमातुन त्यांच्या गावी पाठविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.
दि. 10 मे रोजी उत्तरप्रदेशमध्ये पाठविण्यात आलेल्या मजुरांकडून रेल्वेच्या तिकीट भाड्यापोटी प्रत्येकी 595 रुपये घेण्यात आले होते. परंतु या मजुरांच्या तिकीटाचा खर्च राज्य शासनामार्फत करण्याचा निर्णय घेतल्याने दि. 12 मे रोजी उत्तरप्रदेशकडे जाणार्या तसेच बिहार राज्यात जाणार्या मजुरांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले. दि. 12 मे रोजी च्या विशेष श्रमिक रेल्वेसाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत चोख असे नियोजन करत या श्रमिकांना उत्तर प्रदेशमध्ये येण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून लेखी परवानगी प्राप्त करुन घेत कामगारांच्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करण्यात आली. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व मजुरांच्या प्रवासासाठी लागणार्या तिकीटाचे पैसे प्रशासनामार्फत अदा करण्यात आले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अडकुन पडलेल्या या मजुरांना जालना येथे आणण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष बसची सोयही करण्यात आली होती. प्रवास करणा-या मजुरांची सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातुन रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालविण्यात येणा-या या रेल्वेचे पुर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येवून प्रवास करणा-या प्रत्येकाने चेह-यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात आली. रेल्वेमधुन पाठविण्यात येणा-या प्रवाशांना सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले होत. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करुन त्यांच्यासोबत खाद्य पदार्थही देण्यात आले. यावेळी तहसिलदार श्रीकांत भुजबळ, बालकामगार प्रकल्प अधिकारी मनोज देशमुख, पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक श्री महाजन यांच्यासह महसुल, रेल्वे, पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
Leave a comment