विरोधकांकडून बालिश राजकारणाचे दर्शन-जयदत्त क्षीरसागर
बीड । वार्ताहर
जगभरात आणि देशभरामध्ये कोरोना विषाणूच्या हाहाकार माजलेला असतांना आणि राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा वाढत असतांना आपल्या कर्मभूमीमध्ये जावून निदान लोकांची चौकशी करायला हवी, मतदार संघामध्ये शासकीय यंत्रणा चांगले काम करत आहे, त्याचा लोकांना किती फायदा होतो, हे पहायला हवे, लोकांच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होण्याची माझी संस्कृती आहे. स्व.काकु-नानांनी तसे संस्कार माझ्यावर घडवले आहेत. लोकांच्या सहभागातून, कोरोना विषाणू नष्ट होणार आहे. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन चांगले काम करत असल्याने जिल्ह्यात परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे शासनाची रितसर परवानगी घेवून केवळ संस्थेचाच कारभार नव्हे तर ज्या लोकांच्या जिवावर आपण राजकारण करतो, त्यांना धिर देणे यासाठी बीड गाठले. शासकीय प्रक्रिया पूर्ण करून हे सर्व केले. परंतू विरोधकांच्या बालिश राजकारणामुळे मन विषन्न झाले. विरोधकांच्या बुध्दीची किव आली. कोरोना विषाणू नष्ट होईल परंतू विरोधकांच्या ठायी भरलेल्या द्वेषाचा विषाणू कसा नष्ट करायचा? अशा शब्दात जयदत्त क्षीरसागरांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देतांना भावना व्यक्त केल्या. खरेतर अनुलेखाने विरोधकांना मारणे ही माझी सवय आहे. परंतू नाही बोलले तर लोक अर्थही वेगळा काढतात म्हणून या भावना व्यक्त करत असल्याचेही जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
गेल्या अनेक वर्षापासून आपण सक्रिय राजकारणात आणि समाजकारणात काम करतो. हे करत असतांना कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही याची जाणीव नेहमीच मी ठेवलेली आहे. मला शासकीय नियमांची पूर्ण माहिती होती. त्यामुळे औरंगाबाद येथे अधिकार्यांची परवानगी घेऊन बीड जिल्ह्यात आलो आहे. शनिवारी जयदत्त क्षीरसागर हे औरंगाबादवरून बीडला आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर देतांना वरिल भावना व्यक्त केल्या. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी काळात शेतकरी, कष्टकरी व इतर शहरवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र या काळात देखील काही जण बालिश राजकारण करत आहेत. दरम्यान, ऊसतोड कामगार व हातावर पोट असणार्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्था प्रशासनाकडून योग्य पद्धतीने केल जात आहे का, याच्यावर आमचे लक्ष असणार आहे. तसेच जिल्ह्यातील परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलणार असल्याचेही जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
Leave a comment