जालना । वार्ताहर
जिल्हा कोषागार अधिकारी ह्या कार्यालयात सातत्याने गैरहजर राहत असल्याने आर्थिक वर्ष उलटून महिनाभरानंतरही शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान रखडले आहे. परिणामी अडचणीत सापडलेल्या ग्रंथालय चालक व कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली असून कोषागार अधिकारी यांच्या विरूद्ध कार्यवाही करावी अशी मागणी ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.
या संदर्भात जालना जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश राऊत यांनी मंगळवारी (ता. 05) यांनी जिल्हाधिकारी डॉ रवींद्र बिनवडे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,जालना जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांना मिळणारे अनुदान आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही वितरित न झाल्याने ग्रंथालय संघाच्या वतीने दि. 16 एप्रिल 2020 रोजी अनुदान वितरित करण्या बाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. मात्र या नंतर ही कोषागार कार्यालयात समन्वयाअभावी बिले मंजूर असून धनादेश ही तयार आहेत. तरीही जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली नाहीत. असे नमूद करून राजेश राऊत यांनी म्हंटले आहे, अनुदान वितरित करण्याबाबत आपण गत महिना भरा पासून कोषागार अधिकारी कार्यालयात नियमित चकरा मारत असून कोषागार अधिकारी ह्या कार्यालयात येत नसल्याचे दिसते.कर्मचारी वर्गाकडे विचारणा केली असता कोषागार अधिकारी केंव्हा येतील हे त्यांना ही माहिती नसल्याचे सांगितले.तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी आणि ग्रंथालयांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.
Leave a comment