बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या अहमदनगर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्याने आणि त्यांच्या चाचण्या पॉजीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील जनतेची जबाबदारी वाढली असून जिल्ह्याचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हयातील जनतेने काळजी घेणे गरजेचे असून प्रशासनाने जिल्हाभरात टाईट फिल्डींग लावली असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्याच्या सर्वच सिमा बंद केल्या आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे साठ रूग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. विशेष म्हणजे दिल्लीच्या निजामोद्दीन भागातील मरकज मस्जीद मध्ये तबलीगी जमातीसाठी गेलेल्या सातही नागरिकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने प्रशासनाने आणि जिल्ह्यातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमन सुरू झाल्यापासून बीड जिल्हा प्रशासनाने सुरूवातीपासूनच विशेष काळजी घेतली. जनता कर्फ्यु झाल्यानंतर राज्य सरकारने संचारबंदी घोषीत केल्यावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लगेचच जिल्ह्यातही संचारबंदी लावली, एवढेच नव्हे तर टप्याटप्प्यामध्ये त्यांनी केलेल्या उपाययोजनांमध्ये जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. बाहेरून जिल्ह्यात येणार्या प्रवाशांना बंदी घालण्यात आली आणि जिल्ह्यातून बाहेर जाणार्या प्रवाशांनाही बंदी घालण्यात आली. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी देखील आपल्या यंत्रणे अगदी थेट ग्रामिण भागापर्यंत कार्यान्वित केले. त्यामुळे रस्त्यावरील नागरीक घरातच थांबले. रस्त्यावर येणार्यांचे प्रमाणही कमी झाले. बीडमध्ये आतापर्यंत जे काही रूग्ण आले ते सर्वच्या सर्व निगेटीव्ह आल्याने जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आता जिल्ह्याशेजारील असलेल्या आणि या जिल्ह्यातून बीडमध्ये येणार्या -जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने उद्या संचारबंदी उठविल्यानंतर शेजारच्या अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद आणि या तीन जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग बीड जिल्ह्यात झाला तर अवघड होवून बसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या जबाबदारीबरोबरच जिल्ह्याचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे आगामी आठवडा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. संचारबंदी शिथील झाल्यानंतर विनाकारण गर्दी करणार्यांची संख्या वाढत आहे, ती संख्या कमी करणेही गरजेचे आहे. निजामोद्दीन भागातील मरकज मस्जीदमधील प्रकार उघडकीस आल्यानंतर नगर जिल्ह्यातील जामखेड येथे 3, नगर येथे 1 आणि नेवासा येथे 3 असे सात रूग्ण कोरोना संशयीत आढळले होते, त्यामध्ये तीन जणांला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे सिद्ध झाले. तिकडे औरंगाबादमध्येही एका रूग्णाला कोरोना झाल्याचे चाचणीमध्ये स्पष्ट झाले, तर उस्मानाबादमध्येही एक रूग्ण आढळला. या तीनही जिल्ह्यात प्रशासनाने कडक संचारबंदी लागु केली आहे. मात्र जिल्ह्याचा धोका वाढल्याने प्रशासनानेही कठोर पावले उचचली आहेत.
घरी रहा, सुखी रहा -रेखावार
कोरोना विषाणूच्या एकंदरीत धोकादायक वातावरणामध्ये जिल्ह्यातील जनतेने आतापर्यंत प्रशासनाला महत्त्वाचे सहकार्य केलेले आहे. आगामी आठ दिवस जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असून जिल्ह्यातील जनतेने घरातच राहणे महत्त्वाचे आहे. घरात राहुन परिवार सुखी ठेवण्याचे पुण्य आगामी आठ दिवसात नागरिकांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. विनाकारण रस्त्यावर येवून गर्दी करणार्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असा ईशाराही त्यांनी दिला आहे.
Leave a comment