जालना । वार्ताहर
संपुर्ण जगात कोरोना विषाणुने दहशत माजवत संपुर्ण जगाला आपल्या कवेत घेत आहे. मृत्यूचे भय काय असते हे मी जवळुन अनुभवले. परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती व वैद्यकीय उपचाराच्या जोरावर मी आज कोरोनामुक्त होऊन मी माझ्या स्वगृही परतत असल्याचा आनंद गगनात मावत नसल्याची प्रतिक्रिया परतुर तालुक्यातील शिरोडा या गावातील कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केली आहे. मी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. मला चार मुली आणि एक मुलगा असुन त्यांच्या भविष्याचे काय होईल, ही चिंता माझ्यासमोर उभी राहीली. परंतु येथील आरोग्य यंत्रणेने माझ्या आजारावर उपचार करण्याबरोबर मला मानसिकरित्या देखील सक्षम केले. त्यामुळेचं मी आज कोरोनासोबतचे युध्द जिंकू शकले आहे. त्यामुळे आजच्या माझ्या आनंदाचे श्रेय हे संपुर्ण आरोग्य यंत्रणेला असल्याची भावनाही महिलेने व्यक्त केली. परतुर तालुक्यातील मौजे शिरोडा येथील महिलेस दि.13 एप्रिल,2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे खोकला व ताप या आजाराचा उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.
महिलेला 6 एप्रिलपासुन ताप व खोकला होता. 6 एप्रिल रोजी महिलेने परतुर व 10 ते 13 एप्रिल दरम्यान जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल झाल्यास दि. 13 एप्रिल रोजी महिलेच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दि. 14 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला मात्र महिलेच्या स्वॅबचा दुसर्यांदा पाठविण्यात आलेल्या नमुन्याचा अहवाल दि.21 एप्रिल, 2020 रोजी रात्री 10.00 वाजता पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. महिलेला तातडीने आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करत उपचार सुरु करण्यात आले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने पाऊले उचलत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा गावातील व्यक्तींच्या तपासणीसाठी आरोग्यपथके गठित करुन 80 कुटूंबातील 560 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व त्यांच्या अधिपत्याखाली सर्व डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स यांच्या अथक परिश्रमातुन महिलेवर उपचार केल्यामुळे शिरोडा गावातील महिलेचा अहवाल सलग दोनवेळेस निगेटीव्ह आल्याने आज दि. 29 एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या महिला रूग्णांस स्वगृही पाठवले. कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या कोरोना निगेटीव्ह रुग्ण महिलेचा चेहरा आनंदीत होता. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभारही महिलेले यावेळी मानले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहर्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर न पडता घरातच रहावे, असे आवाहन कोरोनामुक्त महिलेने यावेळी केले.
Leave a comment