गरोदर मातांच्या प्रसुतीसाठी आणखी एक केंद्र वाढवले
अधिगृहीत तीन रुग्णालयात जागा अपुरी पडू लागल्याने निर्णय
बीड । वार्ताहर
करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा दररोज नवनवीन उपाययोजना करत आहे. ग्रामीण भागातील अनेक गरोदर माता प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असतात. जिल्हा रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांची गर्दी कमी करण्यासाठी शहरातील तीन खासगी रुग्णालये यापूर्वी अधिगृहीत करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणच्या खाटा कमी पडत असल्याने आता आणखी एका महाविद्यालयाची इमारत अधिगृहीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
बीड जिल्ह्यात कोव्हिड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी तसेच जिल्हाधिकारी यांच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार लागू करण्यात आलेल्या सर्व आदेशाचे पालन केले जात आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणा झपाटून कामाला लागली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आंतर रुग्ण व बाह्य रुग्ण विभागात जिल्हाभरातून रुग्ण येत असतात; परंतु आता संचारबंदी लागू असल्याने कोणालाही गरज नसताना रुग्णालयात न येण्याचे आवाहन प्रशासनाने यापूर्वीच केले आहे तर तर पुढे ढकलू शकणार्या इतर सर्वसाधारण शस्त्रक्रियाही नंतर करा असे आवाहन नागरिकांना केले गेले आहे. गर्दीतून विषाणूचा संसर्ग होत असल्याने सध्या नागरिकांना घरातच थांबण्याचे सांगण्यात आले आहे.
हाच धागा पकडत रुग्णालय प्रशासनाने आणखी एक उपाययोजना केली आहे. शहरातील यशवंतराव जाधव हॉस्पिटल शाहूनगर, राम हॉस्पिटल व जिजाऊ हॉस्पिटल बार्शी रोड, बीड या रुग्णालयांना अधिगृहीत केलेले आहे. या सर्व ठिकाणी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून मोफत प्रसुती तसेच सिझर केले जात आहे. परंतु या तीनही ठिकाणी प्रसूतीची संख्या लक्षात घेता तिन्ही रुग्णालयातील खाटा कमी पडत आहेत. त्यामुळे अदित्य आयुर्वेद कॉलेज बीड येथे 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारपासून (दि.7) या ठिकाणी सर्व प्रसुती होतील असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगीतले.
Leave a comment