क्षीरसागरांची भूमिका स्पष्ट होईना; विधानसभेत अवघड प्रश्न

बीड । वार्ताहर

ज्यांच्या सहभागाशिवाय जिल्ह्याचे राजकारण पूर्ण होवू शकत नाही अशी परिस्थिती जिल्ह्याच्या राजकारणात असताना आणि लोकसभेच्या निवडणूकीत काय भूमिका घ्यावी या चक्रव्युहात अभिमन्यूसारखे जयदत्त क्षीरसागर अडकले आहेत. मात्र त्यांचे समर्थक मराठा शिलेदार मात्र आता ऐनवेळी टायमिंग साधत समाजाचा उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांच्या तंबूत दाखल होत आहेत. प्रत्यक्ष जाहीरपणे कोणीही प्रवेश केला नसला तरी अनेकजण आपल्या-आपल्या गावात बजरंग सोनवणेंच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सरपंचापासून ते थेट जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. या संदर्भात ग्रामीण भागातील क्षीरसागरांचे समर्थक असलेल्या मराठा समाजातील प्रमुख लोकांची बैठकही झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
गत विधानसभा निवडणूकीत दीड ते दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागरांचा पराभव झाला. हा पराभव काही भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळे झाल्याचे शल्य क्षीरसागरांच्या मनात अजूनही आहे. त्यावेळी पंकजा मुंडेंनी राजकीय मदतीची भूमिका घेतली असती, आणि कार्यकर्त्यांना समजावले असते तर आपला पराभव झाला नसता असे क्षीरसागरांचे मत झाले आहे.नंतरच्या काळात राज्यामध्ये राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जयदत्त क्षीरसागर निवडून आले असते तर कदाचित त्यावेळी ते जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असते, मात्र क्षीरसागरांच्या पराभवामुळेच ही संधी धनंजय मुंडेे यांना मिळाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि पुन्हा जयदत्त क्षीरसागरांचे वजन सरकारदरबारी वाढले, त्यामुळे काही काळ सत्तेत नसूनही सत्तेत असल्यासारखा राबता त्यांच्याकडे होता. अडीच वर्षांनंतर पुन्हा राज्यामध्ये सत्तांतर झाले आणि भाजपाचे सरकार आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि जयदत्त क्षीरसागरांचे संबंध सर्वश्रूत आहेत. सत्ता कोणाचीही असो, विकास कामांसाठी निधी खेचून आणण्यामध्ये क्षीरसागरांचा हातखंडा आहे. विद्यमान परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत जयदत्त क्षीरसागरांची भूमिका जाहीर झालेली नाही. देवेद्र  फडणवीस यांच्याशी त्यांचे असलेले मैत्रीपुर्ण संबंध पाहता ते जिल्ह्याच्या राजकारणाचे जोडे बाजूला सोडून उद्दात हेतूने भाजपला मदत करतील असेही बोलले गेलेे; मात्र निवडणूक 15 दिवसांवर आलेली असतानाही क्षीरसागरांची भूमिका अजूनही स्पष्ट झाली नाही. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे कदापिही मदत करु शकत नाहीत. कारण ज्याच्यामुळे पराभूत झाले ते संदीप क्षीरसागर हे पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार आहेत.
मदत करायची भूमिका घेतलीच तर क्षीरसागरांसमोरही भाजपाशिवाय पर्याय नाही. परंतु पंकजा मुंडेंबद्दल त्यांच्या मनात नाराजी आहे. त्यामुळे भूमिकाच घ्यायची नाही, कोणाला मदतही करायची नाही अन् विरोधही नाही अशा मानसिकतेत जयदत्त क्षीरसागर असल्याचे त्यांचेच समर्थक सांगतात. परंतु राजकारणात भूमिकेला कायम महत्व असते. निवडणूका या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना अस्तित्व सिध्द करण्यासाठी संधी देवून जातात. उद्या चार महिन्यावर पुन्हा निवडणूका आहेत. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांना भूमिका स्पष्ट करणे क्रमप्राप्त आहे, असे समर्थकांचे म्हणणे असले तरी, क्षीरसागर केवळ ऐकून घेवून पाहू, बघू, असे बोलून कार्यकर्त्यांचे समाधान करत आहेत. नेत्यांचे अशी उत्तरे किती दिवस ऐकायची? या मानसिकतेतून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शेवटी बजरंग सोनवणेंना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे
.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.