कोरोना नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक
बीड । वार्ताहर
कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले असून, मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे.
अशा बदलांचा स्वीकार करुन, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आता जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे. जोवर कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करुन या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे,
बाजारात जाताय; हे करा
१. बाजारपेठेतखरेदीला जाताना घरातील एकाच व्यक्तीने जाणे, तसेच कमी गर्दीच्या वेळी जाणे.
२. दुकानांबाहेर तसेच आतमध्येही इतरांपासून सुरक्षित अंतर राखूनच वावर होईल, याची काळजी घ्यावी.
३. गर्दी असल्यास तिथे प्रवेश करु नये. लिफ्टऐवजी शक्यतो जिन्यांचा वापर करावा. कठड्यांना स्पर्श करु नये.
४. खरेदीला गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे.
५. खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाइन पद्धतींचा वापर करणे.
६. खरेदी करुन आणलेल्या वस्तू काही काळ घराबाहेर / मोकळ्या जागेत / जिथे कोणाचाही स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्यात.
७. दुकानदार/व्यावसायिक यांनी मास्क न लावलेल्या ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
८. दुकाने/मंडया/संकूल येथे सुरक्षित अंतराच्या खुणा करुन मर्यादीत ग्राहकांनाच एकापाठोपाठ प्रवेश द्यावा.
९. दुकानात प्रवेश करणाऱया प्रत्येकासाठी शारीरिक तपमान, सॅनिटायझर यांची व्यवस्था करावी.
१०. दुकाने/मंडया/संकूल येथे मर्यादीत संख्येनेच नोकर/मदतनीस यांची नियुक्ती करावी.
प्रवास करताना...
१. सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये.
२. मास्कसमवेत फेसशिल्डचाही उपयोग केल्यास उत्तम.
३. सार्वजनिक वाहनात एका आसनावर एकाच व्यक्तीने आसनस्थ व्हावे.
४. दाटीवाटीने प्रवास करु नये. असा प्रवास टाळणे उत्तम.
५. वाहनांमध्ये दरवाजा, कठडा यांना शक्यतो स्पर्श करु नये.
६. स्पर्श करावा लागणार असल्यास त्या आधी व वाहनातून उतरल्यानंतरही सॅनिटायझर हातांना लावावे.
७. शक्यतो खासगी दुचाकी/चारचाकी वाहनाचा उपयोग प्रवासाच्या गरजेनुसार करावा.
८. खासगी वाहनांमध्ये विनाकारण सहप्रवासी नेऊ नयेत.
हे करा
१. एकदाच वापरात येणारे मास्क (सिंगल यूज मास्क) वापरुन झाल्यानंतर ते टाकून देण्यापूर्वी, त्यावर निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) शिंपडून, त्यांचे तुकडे करुन नंतर टाकावेत. जेणेकरुन त्यांचा पुन्हा वापर करण्यासाठी गैरउपयोग केला जाणार नाही.
२. कुटुंबातील सदस्यांनी शक्यतो वेगवेगळ्या स्वरुपाचे/ मास्क वापरावे किंवा स्वत:च्या मास्कला वेगळी खूण करावी. जेणेकरुन प्रत्येकाचा मास्क ओळखला जाईल. एकमेकांचे मास्क वापरु नये.
३. सोसायटीत दरवाज्याचा कडीकोयंडा, कठडे (हॅण्ड रेलिंग), लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे.
कोरोना’बाबत गरोदर महिलांनी घ्यायची काळजी!
करोनाग्रस्तांची संख्या देशात वाढत असल्यामुळे प्रत्येकाला आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी लागली आहे. त्यात घरात एखादी महिला गरोदर असेल तर ही काळजी चिंता बनणं, साहजिकच आहे.
‘सेंटर फार डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’च्या मते, गरोदर महिला या कोणत्याही प्रकारच्या श्वसनाशी संबंधित संक्रमणांना अधिक संवेदनक्षम असतात आणि त्यामुळेच फ्ल्यूसारखे आजार इतर व्यक्तींच्या तुलनेत गरोदर महिलांसाठी अधिक घातक ठरू शकतात. गरोदर महिलांमधील रोगप्रतिकारक व्यवस्थेत बदल घडतात, तसंच फुफ्फुसं आणि ह्रदय यांवरही परिणाम होत असतो, त्यामुळे असं होत असावं.
सगळीकडे कोरोनाने थैमान घातलं असताना गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गरोदर महिलांना असुरक्षित प्रवर्गात टाकणं, ही एक धोक्याची घंटा आहे आणि ती गांभीर्याने घ्यायला हवी. आपल्याला माहितच आहे की, काही विषाणूजन्य संक्रमणांचे गंभीर दुष्परिणाम गरोदर महिलांवर होतात. त्यामुळेच गरोदर महिलांनी आवश्यक ती खबरदारी घेणं आणि शासनाकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे.
धोका कमी कसा करता येईल?
कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणं दिसत असलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळा.
नियमित हात धुवा.
अन्न योग्य पद्धतीने शिजवून खा. आरोग्यदायी, जीवनसत्वयुक्त पदार्थच खा.
तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कुणीही खोकताना तसंच शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. वापर झाल्यावर हा टिश्यू पेपर कचऱ्याच्या डब्यात टाका आणि हात स्वच्छ धुवा.
बाहेर जाणं टाळा. घरीच थांबा.
फोन किंवा ऑनलाईन माध्यमातून तुमच्या डाक्टरांच्या संपर्कात राहा.
करोना व्हायरसची लागण झाल्यास…
जर तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर कोणत्याही निरोगी व्यक्तीप्रमाणे तुम्हाला कोणताही गंभीर आजार होणार नाही. तुम्ही स्वत:ला क्वारंटाइन- विलग करा आणि लक्षणं अधिक गंभीर होताहेत का, यावर लक्ष ठेवा. जर गंभीर लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला तत्काळ वैद्यकीय काळजीची गरज आहे.
एक लक्षात घ्या की, कोरोना व्हायरस हा एक नवीन विषाणू आहे. त्यामुळे त्याच्याविषयीची पुरेशी माहिती आपल्याला अद्याप नाही. कोरोनामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते किंवा गर्भधारणेत अडथळा निर्माण होतो, याविषयी आपल्याकडे कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. कोरोनाशी संबंधित वैद्यकीय उपचार हे इतर कोणत्याही विषाणूजन्य संक्रमणासाठी केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारांसारखेच आहेत.
कोरोनाची लागण झालेल्या महिलेकडून तिच्या (पोटातील किंवा प्रसूतीनंतर) बाळाला हा विषाणू संक्रमित होऊ शकतो असा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही.
आता तुम्ही काय करायला हवं?
खबदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंगबाबत सरकार देत असलेल्या सल्ल्यांचं तुम्ही पालन करायला हवं. सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा आणि कोरोना व्हायरसची लागण झाल्याची संभाव्य लक्षणं दिसणाऱ्यांपासून कटाक्षाने दूर रहा.
जर गर्भधारणा होऊन तुम्हाला 28 आठवड्यांहून अधिक काळ लोटला असेल तर तुम्ही सोशल डिस्टन्सिंगबाबत विशेष खबरदारी घ्यायला हवी.
जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला ताप आला किंवा नव्याने, सततचा खोकला सुरु झाला तर तुम्ही सात दिवस घरातच रहायला हवं आणि जर सात दिवसांतही तुमची स्थिती सुधारली नाही, तुमचा आजार वाढतच गेला किंवा घरात राहून या स्थितीवर मात करता येणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर पुढील उपचारांसाठी तुम्ही रुग्णालयात दाखल करुन घ्यायला हवं.
सर्वसाधारण सूचना-
- सर्व प्रकारची खबरदारी घ्या.
- शांत रहा आणि सकारात्मक विचार करा.
- जीवनसत्वांनी परिपूर्ण असा आरोग्यदायी आहार घ्या.
- सक्रीय रहा. थोडासा व्यायाम करा.
- पुरेशी झोप घ्या.
- ताण आणि चिंता दूर करण्यासाठी ध्यानधारणा करा.
Leave a comment