बीड । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना धाराशिव यांच्या वतीने दरवर्षी दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यामध्ये बीड येथील प्रसिध्द होमिओपॅथीक तज्ञ डॉ.सतिष लड्डा यांना दिव्यांग भुषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. सदरील पुरस्कार मंगळवारी दि.3 डिसेंबर रोजी धाराशिव येथे जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे पाटील,
विभागीय उपाध्यक्ष सुधीर काळे, राज्य संचालिका अंजना पापडे यांच्यासह जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाचे विविध अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. मागील तीस वर्षांपासून होमिओपॅथी उपचार पद्धतीद्वारे हजारो रुग्ण बरे केलेले डॉ लड्डा हे स्वतः दिव्यांग आहेत आणि महाराष्ट्रातील हजारो दिव्यांगजन यांना त्यांच्या दैनंदिन अडचणीत तत्पर मदत करतात त्यांच्या दिव्यांग हिताच्या कार्यामुळे अनेक दिव्यांगजन यांच्या रोजच्या अडचणी सुटण्यासाठी मोलाची मदत झाली आहे.डॉ.लड्डा यांनी दिव्यांग हिताचे अनेक माहितीपर व्हिडीओ बनवले आणि प्रत्येक जीआर, परिपत्रक सुलभ भाषेत प्रत्येक दिव्यांगपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना, यांनी त्यांची कार्याची दखल घेऊन, त्यांना दिव्यांग भूषण पुरस्कार पुरस्कार, मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव केला. मनोगत व्यक्त करताना, डॉ लड्डा, यांनी सांगितले की असंख्य दिव्यांगजन यांना दिव्यांग हक्काच्या सर्व बाबी माहीत होतं नाहीत, ते सर्व प्रत्येक दिव्यांगांना मिळावे या साठी मी प्रयत्न करतो. दिव्यांग स्वतःच्या अधिकारासाठी जागरूक होणे गरजेचे आहे. मी निस्वार्थ भावनेने जीवनाच्या शेवटच्या श्र्वासापर्यंत दिव्यांगहितासाठी काम करत राहील या त्यांच्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Leave a comment