गुरुकुल शाळेसमोर गटारगंगा ; पालक संघटना आक्रमक
बीड । वार्ताहर
बीड शहरातील नामांकित असलेल्या गुरुकुल इंग्लिश स्कूल समोर शेजारच्या वसाहतीतील साचत असलेले सांडपाणी आणि कचराकुंडी मुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असुन डासाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दोन तीन
वर्षांपासून बीड नगर परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कुठलीच कार्यवाही होत नाही. गुरुकुलच्या गेट समोर अक्षरशः गटारगंगेचे स्वरूप आले असुन गुरुकुलच्या अडीच हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी
पालक संघटना आक्रमक झाली असुन याप्रश्नी बीड न प समोर लवकरच पालक व विद्यार्थी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे समजते . पालक संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
मागील काही वर्षांपासून जालना रोड वरील गुरुकुल इंग्लिश स्कूल समोर परिसरातील नाल्यातील दुर्गंधीयुक्त घाण पाणी साचत आहे. या भागात नगर परिषदेकडून नाल्याचे अर्धवट काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या
भागातून नाली काम करायला हवे तिकडे नाली काम न करता गुरुकुल शाळेच्या गेट समोर अर्धवट नालीकाम करून ठेवले आहे. नालीसाठी पुढे कुठलाही मार्ग नसताना सदरील नाली शाळेसमोर आणून सोडली आहे. त्यामुळे
परिसरातील वसाहतीतील सर्व सांडपाणी शाळेसमोर साचत आहे. परिणामी विद्यार्थी व पालकांना शाळेत येण्यास अडचण येत आहे.त्यातच परिसरातील नागरिकांनी शाळेसमोर कचरा टाकण्यास सुरुवात केल्याने सर्वत्र घाणीचे
साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे गुरुकुल मध्ये शिकण्याऱ्या अडीच हजार विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात गुरुकुल प्रशासनाने अनेकदा नगर परिषदेकडे पाठपुरावा केला आहे पण न. प कडून
कुठलीही कार्यवाही झाली नाही. गुरुकुल इंग्लिश स्कूल ही बीड शहरातील प्रतिथयश केंद्रीय अभ्यासक्रमाची शाळा असुन सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेसमोर निर्माण झालेल्या समस्ये कडे नगर परिषद डोळेझाक करत
असुन तात्काळ याबाबतीत कार्यवाही होवून शाळे समोर करून ठेवलेल्या नालीचा मार्ग बदलून कायम स्वरूपी प्रश्न मार्गी लावावा अन्यथा पालक, विद्यार्थी व शाळा प्रशासनाच्या वतीने
नगर परिषदे समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे पालक संघटनेकडुन कळविण्यात आले आहे. याबाबतीत लवकरच बीड जिल्हाधिकारी यांना भेटून पालकवर्ग निवेदन देणार असल्याचे समजते.
Leave a comment