मंठा प्रतिनिधी :- शेतकर्यांच्या फळभाज्या घाऊक बाजारात विकण्यासाठी आणि नियमित बिटासाठी तहसीलदार सुमन मोरे यांनी परवानगी दिली आहे. याबाबत आमदार राजेश राठोड यांनी प्रशासनास पत्र पाठवून परवानगी देण्याबाबत सूचना केली होती.
मंठा आठवडी बाजारात मोठया प्रमाणात ग्रामीण भागातून फळभाज्या घाऊक बाजारात विक्रीसाठी येतात. परंतू लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला बीट होत नसल्याने शेतकर्यांना अत्यंत कमी दराने आपला शेतीमाल विकावा लागत होता. व्यापारी कवडीमोल किमतीने शेतकर्यांचा भाजीपाला खरेदी करून अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांना विकत असल्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना मोठा फटका बसत होता. याविषयी अनेक शेतकर्यांनी आमदार राजेश राठोड यांच्याकडे आपल्या व्यथा व्यक्त केल्या. याबाबत आ. राठोड यांनी तातडीने तहसीलदार सुमन मोरे यांना पत्र लिहून भाजीपाला बीट नियमांचे पालन करून नियमित सुरू ठेवण्याबाबत सूचना केली. तहसीलदार यांनी तातडीने नगरपंचायत मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून फिजिकल डिस्टन्स पाळून भाजीपाला बीट नियमित सुरु ठेवण्याच्या आणि त्याचा अहवाल पाठवण्याची सूचना केली. दरम्यान आ. राजेश राठोड यांनी शेतकर्यांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्व शेतकर्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
Leave a comment