जालना । वार्ताहर
घरात दुःखाचा डोंगर झेलत असलेल्या कुटुंबाचे घर केले चोरट्यानी साफ ही घटना शहरातील रामनगर कॉलनीत घडली असून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह दहा लाखाचा ऐवज लंपास केला आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की रामनगर कॉलनीतील रहिवाशी असलेले कोरोनाने आईला हिरावून नेल्याचे दुःख अद्याप ताजे असतांनाच क्वारटाईन करण्यात आलेल्या कुटुंबाच्या घरी डल्ला मारून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळून सुमारे दहा लाखाचा ऐवज लांबवला असल्याची घटना आज मंगळवारी सकाळी शहरातील रामनगर भागात उघडकीस आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की,शहरातील रामनगर भागातील एक महिला कोरोना बाधीत आढळून आल्यानंतर सदर महिलेला उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच सदर महिलेचा दि.21 जुलै रोजी मृत्यू झाल्याने या महिलेच्या तीन मुलांसह सुना, नातवंडे अशा सर्वांना दि.23 जुलै रोजी मंठा चौफुली जवळ असलेल्या डठझऋ च्या नवीन इमारतीमध्ये क्वॉरटाईन करण्यात आले होते. घरी कुणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी या कुटुंबाच्या घरी आज दि.28 जुलै मंगळवारी पहाटे डल्ला मारून 15 ते 16 तोळे सोन्याचे दागिने,47 तोळे चांदी आणि रोख रक्कम असा जवळपास 10 लाखाचा ऐवज लांबवला आहे. हा प्रकार शेजारी असलेल्या लोकांनी सदर कुटुंबातील सदस्यांना कळविल्यानंतर या कुटुंबातील सदस्य तातडीने घरी पोहचून प्रथम घरातून काय काय चोरीस गेले याची चाचपणी केली.आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. चोरीस गेलेल्या ऐवजाची माहिती देऊन लेखी फिर्याद देखील दिल्याचे समजते.दरम्यान, आईच्या निधनाचे दुःख अद्याप शमले नसतांना चोरीची घटना घडल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.एस. चैतन्य यांनी गांभीर्याने दखल घेऊन या चोरीचा तपास तातडीने लावण्याचे आदेश संबधीत पोलीसांना द्यावेत अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
Leave a comment