जालना । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणणे व कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव आणखी वाढु नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याने व यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी महाराष्ट्र कोव्हिड -19 उपाययोजना नियम 2020 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदी अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करत जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचे मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे.
कर्मचार्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडल्यास अथवा कर्तव्यावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यास त्यास प्रति दिवस 1 हजार रुपयाप्रमाणे दंड आकारण्यात यावे. या दंडाची रक्कम कमाल रुपये एक हजार रुपयांपेक्षा जास्त असु नये. सदरील दंड हा त्यांचे नियंत्रण अधिकारी, कार्यालय प्रमुख यांनी आकारण्याची कार्यवाही करावी. नियंत्रण अधिकारी, कार्यालय प्रमुख यांनी सदरील कर्मचारी यांच्यावर नियंत्रण न ठेवल्यास त्यांनाही नियंत्रण अधिकारी, कार्यालय प्रमुख यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडल्यास अथवा कर्तव्यावर गैरहजर असल्याचे निर्दशनास आल्यास त्यास प्रति दिवस रुपये दोन हजार रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात यावा. दंडाची रक्कम कमाल दोन हजार रुपयांपेक्षा जास्त असू नये. तसेच नियंत्रण अधिकारी, कार्यालय प्रमुख यांनी मुख्यालय सोडल्यास अथवा कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्यास त्यास प्रति दिवस 2 हजार रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात यावा व दंडाची रक्कम दोन हजार रुपयांपेक्षा जास्त असु नये. नियंत्रण अधिकारी, कार्यालय प्रमुख यांनी याबाबत त्यांच्या अधिनिस्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या निर्दशनास ही बाब तात्काळ आणावी. दंडाची रक्कम ही शासनास उचित जमा लेखा शिर्षांतर्गत जमा करावी व दर महिन्यास वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेचा तपशील पुढील महिन्याच्या 5 तारखेपुर्वी विना विलंब सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशाद्वारे दिले आहेत.
Leave a comment